सुषमा स्वराज यांचा सिंगापूर दौरा
भारतातील १०० शहरांच्या विकासासाठी आता भारताने या क्षेत्रात विशेष तज्ज्ञ असलेल्या सिंगापूरचे सहकार्य मिळवले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी २४ तासांच्या आपल्या वेगवान दौर्यात यासंदर्भात सिंगापूरकडून होकार प्राप्त केला आहे. देशातील १०० शहरांच्या विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सात हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
याबरोबरच सुषमा स्वराज यांनी सिंगापूरबरोबर संरक्षण, सुरक्षा यासह आर्थिक क्षेत्रासाठी सहकार्य वाढविण्यात यश मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिंगापूरचे विदेश व्यवहारमंत्री के. षण्मुगस यांच्याशी स्वराज यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यात साधनसुविधा प्रकल्प तसेच दिल्ली-मुंबई आणि चेन्नई-बंगळूर औद्योगिक कॉरिडॉर निर्मिती या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी स्वराज यांनी षण्मुगम यांच्याकडे सहकार्याची विनंती केली असे सूत्रांनी सांगितले. सिंगापूर-भारत यांच्यातील द्विपक्षीय राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून स्वराज यांनी सिंगापूरचा हा छोटेखानी दौरा केला.