भारतातील वृक्षविशेष

0
274
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

आपले सारे मौखिक वाङ्‌मय फुलले, बहरले, सुफलित झाले ते वृक्षवल्लरींच्या सान्निध्यामुळे, संदर्भांमुळे. आपण सारे वाढलोच मुळी वृक्षांच्या सावलीत. फुलांचा सुगंध घेत. फळांचा आस्वाद घेत. सृष्टितत्त्वात झाडांना नाकारले तर आपण स्वतःलाच नाकारल्यासारखे आहे.

बदामाचे झाड हे मूळचे मलेशियाच्या किनार्‍याजवळच्या बेटांवरचे आणि खुद्द मलेशियाच्या वालुकामय किनार्‍यावरचे. पण भारतात ते सर्वत्र वाढताना दिसते. त्याला वालुकामय जमीन आणि उष्ण हवामान मानवते. समुद्रकिनार्‍यावर त्याची चांगली वाढ होते. त्याची वाढ भरभर होते. त्याची साल उदी रंगाची आणि गुळगुळीत असते. त्याच्या फांद्या बर्‍याच उंचीवर सुरू होतात आणि त्या खोडाला काटकोनात फुटतात. त्यांचे एकमेकांवर समांतर थर दिसतात. या वैशिष्ट्यपूर्ण फांद्यांमुळे हे झाड चटकन ओळखता येते. या झाडाच्या फांद्या बर्‍याच लांबवर पसरत जातात.

खरेखुरे बदामाचे झाड मात्र वेगळे असते. ते ‘पीच’ जातीचे झाड असते. त्याची पाने मोठी, खरखरीत आणि चिवट असतात. वर्षातून एकदोनदा ती लालभडक होऊन गळून पडतात. नव्याने फुटणारी पाने सौम्य पण तजेलदार हिरव्या रंगाची असतात. ती जसजशी जून होतात तसतशी अधिकाधिक गडद होत जातात.
या झाडाच्या लंबगोलाकृती कठीण कवचामध्ये दाणा असतो. तो चवीला बराचशा खर्‍या बदामासारखा असतो. याच्या फळांपासून काढलेले तेल बरेचसे खर्‍या बदामाच्या तेलासारखे असते. या झाडाचे लाकूड इमारतीच्या कामासाठी वापरले जाते.
टसर रेशमाचे कोश विणणार्‍या किड्याला बदामाची पाने खायला खूप आवडतात, म्हणून रेशीमधागा मिळवण्याचा उद्योग जिथे चालतो, तिथे सुरवंटांना खाद्य मिळावे या हेतूने या झाडांची लागवड केली जाते.

तामण वृक्ष आसाम, ब्रह्मदेश, श्रीलंका आणि केरळ या प्रदेशांत आढळतो. भारतात तो सर्वत्र आढळतो. नदीकाठी आणि दलदलीच्या प्रदेशात त्याची वाढ मोठ्या प्रमाणात होते. हा भरभर वाढणारा पानझडी वृक्ष आहे. चांगल्या कसदार जमिनीत तो खूप दणकट होतो. अवघ्या दोन वर्षांतच त्याला फुले येऊ लागतात. त्याची साल फिकट करड्या रंगाची असते. तिचे ढलपे निघतात. खोडावर उंच उंचावर फांद्या फुटतात. त्या सर्वत्र पसरतात आणि छान डोलारा निर्माण करतात. केरळमध्ये या झाडाची जंगले आहेत. याच्या फुलांना बहर आला की ती फार शोभून दिसतात. फुले एप्रिलमध्ये येतात आणि ती जूनपर्यंत राहतात. बर्‍याचदा पुन्हा जुलै-ऑगस्टमध्ये फुले येतात. सहा-सात पाकळ्यांची बैंगणी रंगाची ही फुले असतात. या झाडाचे लाकूड खूप दणकट असते. नावा बनविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. झाडाच्या अन्य भागांचा उपयोग औषधे बनविण्यासाठी होतो. टॅनिन काढण्यासाठी त्याचा वापर होतो. कातडे कमावण्याच्या प्रक्रियेत याचा उपयोग होतो.

रस्त्याच्या दुतर्फा शोभा वाढवण्यासाठी या झाडाची लागवड केली जाते.
बहावा हा वृक्ष सुंदर फुलोर्‍यामुळे अत्यंत आकर्षक वाटतो. त्याला ‘अमलतास’ असेही म्हटले जाते. या वृक्षाचा विस्तार श्रीलंका, भारत, मलाया, पाकिस्तान येथेपर्यंत झाला आहे. शिवाय आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथेही तो आढळतो. तो बाहेरून आणून लावलेला असला तरी भारतात त्याची स्वाभाविक वाढ झालेली आहे. कोकणात आणि घाटमाथ्यावरील जंगलात तो आढळतो. महाभारतात आणि रामायणात त्याचा ‘कर्णिकार’ असा उल्लेख आढळतो.

कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’त त्याचा उपयुक्त वृक्षांच्या यादीत समावेश केला गेलेला आहे. आयुर्वेदिक ग्रंथांत व संस्कृत वाङ्‌मयात त्याचा उल्लेख येतो. हा सरळ खोडाचा, पानझडी आणि शेंगा धारण करणारा असतो. बहाव्याचा वृक्ष सुमारे ६ ते १५ मीटर उंचीचा आणि १ ते १.५ मीटर घेराचा असतो. त्याची साल खरबरीत, पिंगट असते. त्याची पाने संयुक्त, मोठी, समदली पिसासारखी असतात. दलांच्या ४ ते ८ जोड्या असतात. प्रत्येक दल ५ ते १३ सें.मी. लांब असते. पाने नसताना मार्च ते जूनमध्ये पिवळ्याजर्द फुलांच्या त्याला मोठ्या, सुंदर लोंबत्या मंजिर्‍या येतात. त्या दुरूनही आपले लक्ष वेधून घेतात. याच्या फळातील मगज माकडे व अस्वले आवडीने खातात.

बहाव्याच्या सालीचा उपयोग कातडे कमविण्यास होतो. फळांतील मगज पाण्याच्या सहाय्याने काढून व गाळून त्याचा औषधासाठी उपयोग केला जातो. बहाव्याचे लाकूड जड, मजबूत व टिकाऊ असते. ते रंधून व घासून गुळगुळीत व चकचकीत होते. रस्त्याच्या दुतर्फा व बागेत शोभेसाठी हा जलद वाढणारा वृक्ष लावला जातो.

भेरली माड हा शाखाविहीन माड. त्याची उंची १५ ते २० मीटर असते. काहीवेळा ती ३० मीटरपर्यंत असू शकते. त्याचे खोड गुळगुळीत दंडगोलाकार, वलयांकित राखाडी अथवा दगडी रंगाचे असते. त्याची पाने मोठाली म्हणजे जवळजवळ ५ ते ६ मीटर लांबीची व ४० सें.मी. रुंदीची असतात. ती द्विपिच्छाकृती, पर्णिका माशाच्या शेपटीसारख्या किंवा परासारख्या असतात. पर्णाग्र दंतुर असते.

१०-१५ वर्षांच्या वाढीनंतर हे झाड फुलते. फुलांचे मोठाले लोंबते घोस त्याला असतात. त्याला वजनदार मंजिर्‍या असतात. त्या अत्यंत आकर्षक वाटतात. समारंभातील, सभा-संमेलनातील प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट करण्यासाठी या घोसांचा सर्रास उपयोग केला जातो. याला २ सें.मी. व्यासाची गोलाकार जांभळट काळी फळे येतात. सदाहरित जंगलात हा वृक्ष सर्रास आढळतो. शेतीच्या अवजारांसाठी त्याच्या खोडाचा वापर केला जात असे. त्याच्या काड्यांचा बोरूप्रमाणे लेखणीसाठी उपयोग केला जात असे.
भेंडी हा लहानसा अथवा मध्यम आकाराचा सदाहरित वृक्ष होय. त्याची उंची साधारणतः १० ते १५ मीटर असते. खोड सरळ असते. राखाडी रंगाची भेगाळलेली साल असते. फांद्या जवळजवळ असतात. त्यामुळे पर्णसंभार दाट वाटतो. पाने रूंद, हृदयाकार असतात. अग्र टोकदार असते. त्याचे काहीसे सादृश्य पिंपळपानाशी असते. त्याला तजेलदार पिवळी फुले येतात. मध्यभाग गडद मखमली जांभळा/तपकिरी असतो. गळून पडताना फूल केशरी होते. जंगलात या झाडाची स्वाभाविक वाढ होते. बर्‍याच वेळा रस्त्याच्या दुतर्फा सावलीसाठी मुद्दाम लागवड केली जाते.

अक्रोड हा मोठा, पानझडी आणि सुगंधी वृक्ष आहे. हा मूळचा इराणमधला. आता तो उत्तर भारत, दक्षिण युरोप, सीरिया आणि अमेरिका या देशांत आढळतो. भारतात तो हिमालयात व आसाममध्ये आढळतो. काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश येथे त्याची लागवड केली जाते. तो निसर्गतः २४-३० मीटर उंच असून खोडाचा घेर ३ ते ४ मीटर असतो. फळांसाठी याची लागवड करताना उंची कमी ठेवून फांद्यांचा विस्तार वाढवतात.

या वृक्षाला उत्तम निचर्‍याची खोल जमीन लागते. सुमारे ७५ सें.मी. पाऊस (किंवा पुरेसा पाणीपुरवठा) हिमतुषार आणि अतिउष्ण तापमानाचा अभाव असणारे हवामान लागते. सामान्यतः रोपे तयार करून किंवा कलमांनी त्याची लागवड करतात. काही ठिकाणी बी पडून आपोआप उगवलेली रोपे तशीच वाढवतात. रोपे तयार करण्यास निवडक बी वाफ्यामध्ये ३० सें.मी. अंतरावर खोल पुरून ठेवतात. दुसर्‍या वर्षी रोपे लावण्यास तयार होतात. खत व पाणी सहसा देत नाहीत. लागवडीनंतर आठ-दहा वर्षांनी फळे येतात. दर वृक्षाला सुमारे ३५ कि.ग्रॅ. फळ येते. १०० वर्षांपर्यंत त्याला फळे येतात.

मुखशुद्धी व सुका मेवा म्हणून अक्रोडाचे बी महत्त्वाचे आहे. ते मेवामिठाईत व आईस्क्रीममध्ये वापरतात. कच्च्या फळांपासून लोणची, मुरंबे, चटणी व सरबत बनवितात. हिरवी साल अनेक रोगांवर औषध म्हणून वापरली जाते. बियांचे तेल खाद्य असून चित्रकाराचे रंग, साबण यासाठी वापरतात. पेंड व पाने जनावरांना चारा म्हणून देतात.

अक्रोडाचे लाकूड मध्यम कठीण, जड, बळकट आणि करडे-भुरे असते. सजावटी सामान व अन्य सुबक वस्तूंसाठी ते वापरले जाते.
ओक वृक्ष भारताच्या हिमालय पर्वताच्या प्रदेशात, आसाम व ब्रह्मदेश येथे आढळतो. त्याच्या साधारणतः ३५ जाती भारतात आढळतात. वंजू, मोरू, मारा, बान, बंज, बार्चर आणि कार्श्यू इत्यादी स्थानिक नावांनी भारतात हा वृक्ष ओळखला जातो. काही ओक सदापर्णी तर काही पानझडी असतात. बहुतेक जातींचे लाकूड बळकट, टिकाऊ, काहींत कठीण, काहींत नरम असून जळण, घरबांधणी, जहाजबांधणी, रेल्वेमार्ग, पूल, गिरण्या, पिंपे, सजावटी सामान, काठ्या असे बहुउद्देशीय असते. काही ओक वृक्षांची पूर्ण वाढ पन्नास ते शंभर वर्षांत होते. हा दीर्घायुषी वृक्ष आहे. पांढरे व काळे ओक असे सामान्यतः दोन प्रकार आढळतात. भारतातील ओक वृक्षांच्या जातीपासून काही महत्त्वाच्या शंकुमंत वृक्षांना संरक्षण मिळते. हिमालयी ओक वृक्षाची फळे लघवी साफ करणारी, दम्यावर गुणकारी आणि मुलांचे अजीर्ण, जुलाब इत्यादींवर औषध म्हणून देतात. शोभेसाठी आणि सावलीसाठी ओक वृक्ष लावले जातात.
भारतातील वृक्षविशेषांची अगणितता आहे. त्यांची ओळख करून घ्यायला व द्यायला आपला उभा जन्म पुरणार नाही. वृक्षांची समृद्धी आणि विविधता आपल्या भारतातच अनुभवावी. सृष्टी आणि सृजनशील साहित्य यांचे नाते येथे पुन्हा एकदा अधोरेखित करावेसे वाटते.

आपले सारे मौखिक वाङ्‌मय फुलले, बहरले, सुफलित झाले ते वृक्षवल्लरींच्या सान्निध्यामुळे, संदर्भांमुळे. आपण सारे वाढलोच मुळी वृक्षांच्या सावलीत. फुलांचा सुगंध घेत. फळांचा आस्वाद घेत. सृष्टितत्त्वात झाडांना नाकारले तर आपण स्वतःलाच नाकारल्यासारखे आहे. ज्ञानदेव जेव्हा ‘भूमीचें मार्दव सांगे कोंभाची लवलव’ किंवा तुकाराम ‘शुद्ध बीजापोटीं फळें रसाळ गोमटी’ असे उद्गार काढतात तेव्हा ते सृष्टीशी असलेल्या आपल्या नात्याचा उच्चार करीत असतात.