भारताच्या १५ चौक्यांवर पाकिस्तानचा  गोळीबार; जम्मूत रॉकेटचा मारा

0
138

काल पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना आंतरराष्ट्रीय सीमेवर १५ चौक्यांवर तुफान गोळीबार केला. शिवाय रॉकेट्‌सचाही मारा जम्मूतील गावांच्या दिशेने करण्यात आला. यात भारतीय हद्दीतील अनेक घरांची नासधूस झाली. दरम्यान, पाकिस्तानकडून वाढते शस्त्रसंधी उल्लंघन चिंताजनक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विषय पाकिस्तानकडे उपस्थित करणे अगत्याचे असल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले.
रविवारी पहाटे २ वाजतापासून जम्मू जिल्ह्यातील अर्निना आणि आर. एस. पुरा भागातील आंतरराष्ट्रीय सिमेवरील सुमारे १५ चौक्यांवर पाकिस्तानच्या बाजूने अंधाधुंद गोळीबार व रॉकेटचा मारा सुरू झाला. भारतीय सैनिकांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले. ही धुमश्‍चक्री काल सकापर्यंत चालू राहिली होती.
रॉकेटच्या मार्‍यामुळे सिमेशेजारील गावांतील गुरे दगावली तसेच घरांची व गोठ्यांची नासधूस झाली. गावकर्‍यांनी काल दिवसभर शेतात न जाता घरात राहणे पसंत केले. दरम्यान, पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार अचानक वाढला तर सिमेवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोचवण्याची व्यवस्था करून ठेवली असल्याचे लष्कर सूत्रांनी सांगितले.
गेल्या पाच दिवसांतील हे शस्त्रसंधीचे पाचवे उल्लंघन आहे. दि. १८ रोजी पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात एक बीएसएफ जवान शहीद झाला होता.