>> हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश
आवाजापेक्षाही अधिक वेगाने जाणार्या ‘हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन वेहिकल’ (एचएसटीडीव्ही) या प्रक्षेपकाची काल भारताने यशस्वी चाचणी घेतली. भविष्यातील अवकाशयाने आणि विमानांमध्ये वापरल्या जाणार असलेल्या या तंत्रज्ञानाचा आपल्या प्रक्षेपकामध्ये वापर करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे. आजवर रशिया, चीन, अमेरिका ह्या देशांनीच अशा प्रकारचे हायपरसॉनिक प्रक्षेपक बनवलेले आहेत. भारताच्या संरक्षण संशोधन संघटनेने (डीआरडीओ) हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अवकाश प्रक्षेपक विकसित केला असून याच तंत्रज्ञानाच्या आधारे पुढील पाच वर्षांत भारत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रही बनवू शकेल.
‘आत्मनिर्भर भारता’ च्या दिशेने टाकलेले देशांतर्गत संरक्षणविषयक तंत्रज्ञानातील हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
‘‘ह्या यशस्वी चाचणीमुळे अनेक महत्त्वाच्या तंत्रज्ञानांच्या, साधनांच्या आणि हायपरसॉनिक प्रक्षेपकांच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे’’असे प्रतिपादन डीआरडीओचे प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी काढले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भारतीय संशोधकांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
काय आहे हायपरसॉनिक तंत्रज्ञान?
* हायपरसॉनिक तंत्रज्ञानाने आवाजाच्या किमान पाच पट वेग साधता येतो. भारतीय हायपरसॉनिक टेस्ट वेहिकल आवाजाच्या सहा पट वेगाने धावू शकते असे डीआरडीओतर्फे सांगण्यात येत आहे.
* उडिशाच्या व्हीलर आयलंड येथून या प्रक्षेपकाची चाचणी घेण्यात आली तेव्हा तो प्रति सेकंद दोन कि. मी. पेक्षा अधिक वेगाने किमान वीस सेकंद धावला.
* याच तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेल्या एखाद्या हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राद्वारे चीनच्या कोणत्याही संरक्षण यंत्रणेला पराभूत करता येऊ शकते.
* पुढील पाच वर्षांच्या आत भारत या तंत्रज्ञानावर आधारित क्षेपणास्त्र बनवू शकतो.