भारताच्या कानाकोपऱ्यातून दहशतवाद संपवू

0
2

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सज्जड इशारा

संपूर्ण जग भारतासोबत असल्याचा दावा

भारताच्या कानाकोपऱ्यातून इंच-इंच भूमीतून दहशतवाद संपवला जाईल. एकजूट होऊन जगातील सर्व देश दहशतवादाच्या विरोधात भारतासोबत उभे आहेत. जोपर्यंत दहशतवाद संपत नाही, तोपर्यंत त्यांना शिक्षा दिली जाईल, असा सज्जड इशारा पहलगाममध्ये 26 निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्री शहा यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून पहलगाम हल्ल्याबाबत अशा प्रकारचे भाष्य केले आहे. हे नरेंद्र मोदी सरकार आहे त्यामुळे कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी दिला. दिल्ली येथे बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी उभारण्यात आलेल्या रस्त्याच्या आणि पुतळ्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

देशाच्या प्रत्येक इंच जमिनीवरून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होणारच. या लढाईत केवळ 140 कोटी भारतीयच नाही तर संपूर्ण जग भारतासोबत उभे असूीन जगातील सर्व देश एकत्र आले आहेत आणि दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतीय जनतेसोबत उभे आहेत. जोपर्यंत दहशतवादाचा समूळ नाश होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील आणि ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना योग्य ती शिक्षा नक्कीच दिली जाणार आहे, असा अशारा यावेळी शहा यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडली आहे. याशिवाय देशाच्या सुरक्षेशी संबंधित बैठका रोज होत आहेत. या बैठकांमध्ये पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्याची रणनीती आखली जात आहे. पहलगामच्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या घटनेचा बदला घ्यावा, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. जनभावना लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर तशा घडामोडी घडत आहेत.

दहशतवादी अजूनही काश्मीरमध्ये?
पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याला एका आठवड्याहून अधिक दिवस झाले असून सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून महत्त्वाची बाब समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरमध्ये लपलेले असल्याचे ठोस संकेत मिळाले आहेत. मात्र भारतीय लष्कर किंवा जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात बैसरन व्हॅलीमध्ये प्रवेश केला होता. ते योग्य संधीची वाट पाहत होते. 22 एप्रिल रोजी त्यांनी बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांची हत्या केली आणि त्यांनी पळ काढला.

अमृतसर येथे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

भारत-पाकिस्तान सीमेवर अमृतसर येथे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी मिळून ही मोहीम राबवली. अमृतसरमधील भारोपाल गावात बीएसएफच्या इंटलेजिन्स विंगने दिलेल्या टिपच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दोन हँड ग्रेनेड, तीन पिस्तुल, सहा मॅगझीन आणि 50 गोळ्या जप्त करण्यात आल्या.

राजनाथ सिंहांनी अमेरिकन संरक्षणमंत्र्यांशी केली चर्चा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी त्यांचे अमेरिकन समकक्ष मंत्री पीट हेगसेथ यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आहे. यापूर्वी, भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनीही हॉटलाइनवर चर्चा केली होती. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विनाकारण शस्त्रसंधी उल्लंघनाबाबतीत भारताने पाकिस्तानला इशारा दिला होता. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही त्यांचे अमेरिकन समकक्ष मंत्री मार्को रुबियो यांच्याशी दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा केली.

पाकने लपवली एफ 16 विमाने

पाकिस्तानने युद्धाचे सायरन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या एका मंत्र्याने मध्यरात्री पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी आपल्या कुटुंबाला परदेशात पाठवून दिले आहे. भारत आपल्या अणवस्त्र तळांना लक्ष्य करेल, म्हणून त्यांनी अणवस्त्र दुसऱ्या ठिकाणी छेवली आहेत. तसेच आपली सर्वात अत्याधुनिक एफ- 16 विमाने लपवून ठेवली आहेत.