>> भारत १ बाद ११ ; अश्विनचे ४ बळी
रविचंद्रन अश्विनच्या जादुई फिरकीमुळे भारताने नागपूर कसोटीत श्रीलंकेवर पहिल्याच दिवशी वर्चस्व प्रस्तापित करताना त्यांचा पहिला डाव २०५ धावांवर संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात खेळताना पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने आपल्या पहिल्या डावात १ गडी गमावत ११ धावा बनविल्या होत्या.
सामन्यात काल भारताने तीन बदल केले. शिखर धवन, भुवनेश्वर कुमार या दोघांनी दुसर्या सामन्यांतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती. तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळू न शकल्याने त्यांच्या जागी मुरली विजय, रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांना संधी देण्यात आली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांनी लंंकेचा डाव ७९.१ षट्कांत २०५ धावांवर संपुष्टात आणला. सलामीवीर दिमुथ करुणारत्ने (५१) आणि कर्णधार दिनेश चंदिमल (५७) हे दोघे सोडता इतर फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर स्थिरावू शकले नाहीत. ईशांत शर्माने प्रारंभीच सदीरा समरविक्रमाला (१३) चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. लहिरु थिरीमनेच्या (९) रविचंद्रन आश्विनने लंकेला दुसरा झटका दिला. तर रविंद्र जडेजाने अँजेलो मॅथ्यूजला (१०) पायचितच्या जाळ्यात अडकवित लंकेची स्थिती ३ बाद ६० अशी केली. परंतु त्यानंतर दिमुथ करुणारत्ने आणि कर्णधार दिनेश चंदिमलने संघाचा डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करत लंकेला शंभरीच्या पार नेले. हे दोघे फलंदाज लंकेला सावरणार असे वाटत असताना ईशांत शर्माने करुणारत्नेला पायचितच्या जाळ्यात अडकवित जमलेली ही जोडी फोडली.
करुणारत्नेने ६ चौकारांनिशी १४७ चेंडूत ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. चहापानाच्या सत्रापर्यंत लंकेची स्थिती ४ बाद १५१ अशी झाली होती. करुणारत्ने परतल्यानंतर कर्णधार चंदिमलने निरोशन डिकवेलाच्या साथीत संयमी फलंदाजी करताना संघाला दीडशेच्या पार नेले. जडेजाने डिकवेलाला (२४) ईशांत शर्माकरवी झेलबाद करीत भारतला पाचवे यश मिळवून दिले. दासुन शनाका (२) आणि दिलरुवान परेरा (१५) जास्त वेळ खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही. अश्विनने शनाकाचा त्रिफळा उडविला. तर लगेच जडेजाने दिलरुवानला पायचितचा शिकार केले. आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार चंदिमलही अश्विनला रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात पायचित होऊन माघारी परतला. त्याने ४ चौकार व १ षट्काराच्या सहाय्याने ५७ धावांचे महत्त्वपूर्ण अर्धशतकी योगदान दिले. सुरंगा लकमलला (१७) ईशांतने परतीची वाट दाखविली. तर अश्विनने आपला चौथा बळी मिळविताना रंगना हेराथला (४) रहाणेकरवी झेलबाद करीत लंकेचा डाव २९५ धावांवर संपुष्टात आणला. भारतातर्फे अश्विन सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६७ धावांत ४ बळी मिळविले. तर त्याला चांगली साथ देताना रविंद्र जडेजा आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात खेळताना काल भारताची सुरुवातही खराब झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८ षट्कांच्या खेळात १ गडी गमावत ११ धावा बनविल्या होत्या. लोकेश राहुल ७ धावा करून माघारी परतला. दिवसअखेर मुरली विजय (२) व चेतेश्वर पुजारा (२) नाबाद खेळत होते. लंकेतर्फे एकमेव बळी लाहिरू गमागेने मिळविला.
धावफलक,
श्रीलंका, पहिला डाव ः सदीरा समरविक्रमा झे. चेतेश्वर पुजारा गो. ईशांत शर्मा १३, दिमुथ करुणारत्ने पायचित गो. ईशांत शर्मा ५१, लाहिरु थिरिमाने त्रिफळाचित गो. रविचंद्रन अश्विन ९, अँजेलो मॅथ्यूज पायचित गो. रविंद्र जडेजा १०, दिनेश चंदिमल पायचित गो. रविचंद्रन अश्विन ५७, निरोशन डिकवेला झे. ईशांत शर्मा गो. रविंद्र जडेजा २४, दसुन शनाका त्रिफळाचित गो. रविचंद्रन अश्विन २, दिलरुवान परेरा पायचित गो. रविंद्र जडेजा १५, रंगना हेराथ झे. अजिंक्य रहाणे गो. रविचंद्रन अश्विन ४, सुरंगा लकमल झे. वृद्धिमन साहा गो. ईशांत शर्मा १७, लाहिरु गमागे नाबाद ०.
अवांतर ः ३. एकूण ७९.१ षट्कांत सर्वबाद २०९ धावा.
गोलंदाजी ः ईशांत शर्मा १४/३/३७/३, उमेश यादव १६/४/४३/०, रविचंद्रन अश्विन २८.१/७/६७/४, रविंद्र जडेजा २१/४/५६/३.