- – विवेक कुलकर्णी
आपला भारत म्हणजे नररत्नांची खाण. या खाणीतून बंगाल प्रांतात प्रकट झालेले एक नररत्न म्हणजे सुभाषचंद्र बोस. आज त्यांची जयंती. त्यानिमित्त त्यांना व त्यांच्या सहकार्यांना विनम्र अभिवादन!
आपला भारत म्हणजे नररत्नांची खाण. या खाणीतून बंगाल प्रांतात प्रकट झालेले एक नररत्न म्हणजे सुभाषचंद्र बोस. अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्ता, अन्यायाची चीड, आत्यंतिक राष्ट्रभक्ती, पारतंत्र्याची चीड आणि स्वातंत्र्याची अनावर ओढ, परखड विचारसरणी इत्यादी अलौकिक सद्गुणांनी नटलेले हे व्यक्तिमत्त्व. विचार क्रांतिकारी. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ किंवा ‘शस्त्रार्धांना शस्त्रच उत्तर’ अशा जहाल विचारांनी भारलेले व्यक्तिमत्त्व.
इंग्रजांनी भारतात इंग्रजी शिक्षण सुरू केले ते स्वतःच्या स्वार्थासाठी; प्रशासनाला आवश्यक नोकरवर्ग भारतातच तयार व्हावा यासाठी. कारण तो इंग्लंडहून आणणे गैरसोयीचे आणि खर्चिक होते. पण एक गोष्ट मात्र कटाक्षाने पाळली की, भारतीयांनी उच्च शिक्षण घेतले तरी उच्च अधिकाराच्या, पदाच्या जागा भारतीयांना द्यायच्या नाहीत. पण या इंग्रजी शिक्षणामुळे इंग्रजी भाषेच्या माध्यमातून भारतीय तरुणांना जगातील स्वातंत्र्यचळवळींची, विशेषतः अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती इ. माहिती मिळाली. बौद्धिक आणि राष्ट्रीय जागृतीला मदत झाली. तरुणवर्गाला राजकीय पारतंत्र्याची जाणीव होऊन स्वातंत्र्याची आस आणि प्रेरणा मिळाली. त्यातूनच अनेक देशभक्त घडले. बंगालमधील मानवेंद्रनाथ रॉय, रासबिहारी बोस इत्यादी क्रांतिकारकांच्या श्रृंखलेतले एक- सुभाषचंद्र बोस.
स्वातंत्र्यचळवळीच्या तिसर्या वर्गात गांधीजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेची (कॉंग्रेसची) चळवळ अधिक व्यापक आणि तीव्र, प्रभावी बनत होती. साहजिकच सुभाषबाबू तिच्याकडे आकर्षित झाले नाहीत तरच नवल! त्यांनी या चळवळीत सहभाग घेतला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एवढा की लवकरच तरुणवर्गाचे ते चाहते बनले आणि त्रिपुरा येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. पण भारतीय स्वातंत्र्यासाठी काही क्रांतिकारी पावले उचलण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. कार्यकारिणीकडून कदाचित अपेक्षित पाठबळ मिळणार नाही म्हणून त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आणि बाहेर पडून क्रांतिकारी विचारांचा ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यांच्या विचारांनी आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले अनेक स्वातंत्र्यप्रेमी तरुण त्यांना येऊन मिळाले. त्यांचा एक विचार असा होता की, भारतीय स्वातंत्र्याकरिता इंग्रजांबरोबर लढण्यासाठी बाहेरून इंग्रजांच्या शत्रूंची मदत घ्यावी व त्यांच्या मदतीने बाहेरून भारतावर हल्ला करून इंग्रजांच्या तावडीतून भारत मुक्त करावा!
लवकरच युरोपमध्ये दुसर्या महायुद्धाचे वातावरण तयार होऊ लागले होते. व्हर्सायच्या तहाने दोस्तराष्ट्रांनी जर्मनीचे अतोनात नुकसान केले, तेव्हा जर्मनीला गतवैभव मिळवून देणे आणि दोस्तराष्ट्रांचा सूड घेणे असा कार्यक्रम जर्मन जनतेसमोर ठेवून, असंतोषाचा फायदा घेऊन हिटलर जर्मनीत सत्तेवर आला व त्याने युद्धाची तयारी सुरू केली. व्हर्सायच्या तहात दोस्तराष्ट्रांनी इटलीला योग्य वाटा दिला नाही. तो मिळविण्यासाठी दोस्तराष्ट्रांबरोबर लढणे आवश्यक आहे म्हणून या असंतोषाचा फायदा घेऊन फॅसिस्ट बेनिटो मुसोलिनी इटलीचा प्रमुख बनला व त्यानेही युद्धाची तयारी सुरू केली. इकडे आशियात पूर्वेकडे ‘जपान’ हा साम्राज्यवादी देश म्हणून उदय पावत होता. अशा रीतीने जर्मनी, इटली व जपान असा एक साम्राज्यवादी गट तयार झाला. त्याना अक्ष गट (उळी रिुशी) म्हणतात. तर त्याला विरोधी इंग्लंड, फ्रान्स, रशिया या दोस्तराष्ट्रांचा गट. अशी युरोपची दोन गटांत विभागणी झाली.
सुभाषचंद्रांनी या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि असा विचार केला की, आपल्या शत्रूचा (म्हणजे इंग्रजांचा) शत्रू तो आपला मित्र होऊ शकतो! तेव्हा इंग्रजांच्या शत्रूची मदत घेऊन जर भारतावर बाहेरून हल्ला केला तर कदाचित भारत इंग्रजमुक्त होऊन स्वतंत्र होईल. म्हणून ते प्रथम युरोपात गेले. तेथील हुकूमशहांना सगळी परिस्थिती समजावून दिली व मदतीची अपेक्षा केली. पण दुर्दैवाने त्यांना हिटलरकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, म्हणून ते परत आले आणि नंतर जपानचे सहकार्य घ्यावे म्हणून जपानला गेले.
जपानला त्यांच्यापूर्वीच बंगालमधले क्रांतिकारक रासबिहारी बोस गेले होते. तेथील भारतीय स्वातंत्र्यप्रेमींची एक सेना जपानच्या सहकार्याने त्यांनी उभारली होती. तीच ‘आझाद हिंद सेना.’ सुभाषबाबू जपानमध्ये आल्यावर रासबिहारींनी ती सेना त्यांच्या ताब्यात दिली. सुभाषचंद्र आझाद हिंद सेनेचे प्रमुख बनले. तेव्हापासून त्यांना ‘नेताजी’ म्हटले जाऊ लागले. मेजर जगन्नाथराव भोसले, मेजर धिल्लन, कॅप्टन शहानवाज इत्यादी आणि स्त्रियांच्या तुकडीची प्रमुख कॅप्टन लक्ष्मी सहगल असे सहकारी नेताजींना मिळाले. त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. टोकियो नभोवाणीवरून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची घोषणा केली. तरुणांना त्यांनी साद घातली- ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा|’ त्यांच्या आवाहनाला मोठाच प्रतिसाद मिळाला. या सेनेत सामील होऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्याकरिता अनेक तरुण जपानला गेले. ‘जय हिंद’ ही मानवंदना या सेनेची होती. ती घोषणा आजही आपण देतो आहोत. ‘चलो दिल्ली’ असा नारा देत ही सेना भारताकडे निघाली. वाटेतली अनेक ठाणी तिने जिंकली. दोन ठाण्यांना ‘शहीद’ व ‘स्वराज्य’ अशी नावे दिली आणि इंफाळपर्यंत धडक मारली. पण इथे तिला पराभवाला सामोरे जावे लागले. कारण नदीचे पात्र पुराने तुडुंब भरल्याने सैन्याच्या मुक्त हालचालींवर निर्बंध आले. रसद पुरवठ्यावरही परिणाम झाला. तिकडे स्टॅलिनग्राड येथे चहुबाजूने विजय मिळवत जाणार्या जर्मन सैन्याला पराभवाचा पहिला तडाखा बसला आणि तिथून जर्मनीच्या पीछेहाटीला सुरुवात झाली. चर्चिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने शांततेने, संयमाने जर्मन आक्रमणाचा प्रतिकार केला. अमेरिका या युद्धात उतरल्याने दोस्तराष्ट्रांची शक्ती वाढली. जपानचा पराभव झाला. त्यामुळे तिकडून येणारा मदतीचा एकमेव ओघ बंद पडला. त्यामुळे या सेनेचा पराभव झाला. सेनाधिकारी, सैनिक यांना पकडून इंग्रज सरकारने त्यांच्यावर खटले भरले. या दरम्यान नेताजी गुप्तपणे तेथून निसटले. परंतु प्रवासात ‘फार्मोसा’ बेटात विमान अपघात झाला आणि त्यांचा अंत झाला.
आझाद हिंद सेनेवरचा खटला दिल्लीच्या लाल किल्ल्यात सुरू झाला. या सेनेच्या वतीने सरदार पटेल, पं. नेहरू, भुलाभाई देसाई, चित्तरंजन दास इत्यादी प्रसिद्ध कायदेपंडितांनी सेनेची बाजू इंग्लंड न्यायाधीशासमोर अतिशय प्रभावीपणे व भक्कमपणे मांडली आणि अखेर इंग्रज न्यायाधीशांना हे मान्य करावे लागले की ‘परक्या राष्ट्राला वाहिलेल्या निष्ठेपेक्षा स्वदेश प्रेम व स्वातंत्र्य श्रेष्ठ आहे!’ म्हणून त्यांनी सेनेतील सर्वांना निर्दोष मुक्त केले. आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आहे.
आज नेताजींची जयंती. त्यानिमित्त त्यांचे हे स्मरण. त्यांना व त्यांच्या सहकार्यांना विनम्र अभिवादन!