>> वर्ल्ड हॉकी लीग फायनल्स
बेल्जियमचा ‘सडनडेथ’वर पराभव करत भारतीय हॉकी संघाने वर्ल्ड हॉकी लीग फायनल्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. निर्धारित वेळेत उभय संघ ३-३ असे बरोबरीत होते. यामुळे टायब्रेकरचा अवबंल करावा लागला. टायब्रेकरवरदेखील २-२ अशी बरोबरी झाल्याने सडनडेथची मदत घ्यावी लागली. यात भारताचा गोलरक्षक आकाश चिकटेने बेल्जियमचा फटका अडविला तर हरमनप्रीत सिंगने गोल नोंदवून भारताला विजयी केले.
गुरजंत सिंगने ३१व्या मिनिटाला सुरेख मैदानी गोल नोंदवून भारताला आघाडीवर नेले. ३५व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत भारताची आघाडी २-० अशी फुगवली. लुपर्ट लॉईक याने यानंतर ३९व्या व ४६व्या मिनिटाला गोल झळकावत बेल्जियमला २-२ अशी बरोबरी साधून दिली. ४६व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंगने भारताचा तिसरा तर ५३व्या मिनिटाला अमावरी क्योस्टर्सने बेल्जियमला बरोबरी साधून देणारा गोल लगावला. टायब्रेकरवर बेल्जियमतर्फे व्हॅन ओबेल फ्लोरेंट, व व्हॅन डोर आर्थर यांनी गोल केले. त्यांच्या बेगनेझ व्हिक्टर, गॉटियर बोकार्ड व स्टॉक ब्रॉक्स इमान्युएल यांना गोल नोंदविता आले नाहीत. भारताकडून ललित उपाध्याय व रुपिंदर पाल सिंग यांनाच गोलजाळीचा वेध घेता आला.