पुढील वर्षी होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत विद्यमान रौप्यपदक विजेता भारत आपला सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने मंगळवारी जाहीर केलेल्या स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार आशियाई विजेत्या भारताचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात पाकिस्तान, मीगील मोसमातील कांस्यपदक विजेता इंग्लंड, मलेशिया व वेल्स यांचा समावेश आहे. पाचवेळचा विजेता व यजमान ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. आफ्रिका, कॅनडा व स्कॉटलंड यांना ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे.
७ एप्रिल रोजी भारत आपला सलामीचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर वेल्स (८ एप्रिल), मलेशिया (१० एप्रिल) व इंग्लंड (११ एप्रिल) यांच्याशी भारताला दोन हात करावे लागतील. महिलांच्या गटातही भारताला ‘अ’ गटात स्थान मिळाले आहे. यामध्ये इंग्लंड, द. आफ्रिका, मलेशिया व वेल्स हे भारताचे गटसाथी असतील. विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्कॉटलंड, कॅनडा व घाना यांना ‘ब’ गटात स्थान मिळाले आहे. महिला संघ आपल्या मोहिमेची सुरुवात वेल्सविरुद्ध करेल. ५ एप्रिल रोजी ही लढत होईल. यानंतर मलेशिया (६ एप्रिल), इंग्लंड (८ एप्रिल) व द. आफ्रिका (१० एप्रिल) यांच्याविरुद्ध गट फेरीतील उर्वरित लढती भारताला खेळाव्या लागतील. पुरुष व महिला विभागात एका गटातून प्रत्येकी दोन संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील. महिलांचे उपांत्य सामने १२ एप्रिल रोजी व पुरुषांचे उपांत्य सामने १३ एप्रिल रोजी होतील. पुरुष व महिला गटातील कांस्यपदकासाठीचा सामना तसेच अंतिम सामना १४ एप्रिल रोजी होणार आहे.