भारताचा न्यूझीलंडवर ७ गड्यांनी विजय

0
108

>> गोलंदाजांचा नियंत्रित मारा

>> राहुल – अय्यरची समयोचित खेळी

गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मार्‍यानंतर राहुल व अय्यरच्या समयोचित फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने दुसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात यजमान न्यूझीलंडचा ७ गडी व १५ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले १३३ धावांचे लक्ष्य भारताने १७.३ षटकांत ३ गडी गमावून गाठले.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय डावाची सुुरुवात चांगली झाली नाही. टिम साऊथीचा आऊटस्विंग चेंडू शरीरापासून दूरवरून खेळण्याच्या नादात रोहित शर्मा माघारी परतला. यावेळी भारताच्या केवळ ८ धावा झाल्या होत्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात टीम इंडियाने कर्णधार कोहलीच्या रुपात दुसरा गडी गमावला. यष्टिरक्षक टिम सायफर्टने चेंडूचा अंदाज बांधत डावीकडे झेपावत घेतलेला हा झेल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. सुरुवातीलाच बसलेल्या या दोन धक्क्यांनंतर राहुल-श्रेयस जोडीने भारतीय डावाला आधार दिला. राहुलने मोजूनमापून फटके खेळत क्वचितच धोका पत्करला. तुलनेने श्रेयस अय्यरने आपल्या नैसर्गिक खेळावर विश्‍वास दाखवला. आपली ४४ धावांची खेळी त्याने ३ षटकार व १ चौकारांसह सजवली. या द्वयीने तिसर्‍या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी रचली. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमधील एकूण ११वे व सलग तिसरे अर्धशतक ठोकून राहुल ५७ धावांवर नाबाद राहिला. विजयाला आठ धावांची आवश्यकता असताना अय्यर बाद झाला. साऊथीने टाकलेल्या डावातील १८व्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर शिवम दुबेने षटकार ठोकून भारताचा विजय साकार केला.

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. उभय संघांनी या सामन्यासाठी आपल्या संघात बदल न करता पहिल्या सामन्यात खेळविलेलाच संघ उतरवला. मन्रो व गप्टिल यांनी अपेक्षेप्रमाणे किवी डावाची सुरुवात केली. शार्दुल ठाकूरने टाकलेल्या डावातील पहिल्याच षटकात गप्टिलने लागोपाठ दोन षटकार लगावले. न्यूझीलंडने या षटकात १३ धावा वसुल करत आपले इरादे स्पष्ट केले. मोहम्मद शमीने दुसर्‍या टोकाने दुसरा नवा चेंडू हाताळताना आपल्या पहिल्या षटकात केवळ पाच धावा दिल्या. कोहलीने यानंतर शार्दुलची गोलंदाजी बंद करताना तिसरे षटक टाकण्यासाठी बुमराहला पाचारण केले. शमीने टाकलेला दबाव कायम ठेवत बुमराहने अवघ्या पाच धावा दिल्या. न्यूझीलंडचा संघ लक्ष्य करणार हे लक्षात घेऊनही पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकण्यासाठी कोहलीने शार्दुलला पाचारण केले. त्याच्या पहिल्या चार चेंडूंत आठ धावा कुटत न्यूझीलंडने दबाव टाकला. पाचवा चेेंडू निर्धाव टाकल्यानंतर शार्दुलच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात गप्टिल कोहलीकडे झेल देऊन परतला. शार्दुलचा ‘तो’ चेंडू बळी मिळविण्याएवढा घातक नव्हता त्यामुळे भारतासाठी गप्टिलचा बळी ‘बोनस’ ठरला. गप्टिल परतला त्यावेळी फलकावर ४८ धावा लागल्या होत्या. ‘डेथ ओव्हर्स’मध्ये शार्दुलची गोलंदाजी झोडपण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत कोहलीने शार्दुलच्या कोट्यातील काही षटके टाकण्यासाठी अष्टपैलू शिवम दुबेकडे चेंडू सोपविला. दुबेच्या पहिल्या षटकात न्यूझीलंडने दहा धावा जमवल्या. परंतु, दुबेने आपल्या पुढील षटकात धोकादायक कॉलिन मन्रोला तंबूचा रस्ता दाखवत कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरवला. यानंतर खरी कमाल केली ती रवींद्र जडेजाने. आपल्या अचूक टप्प्याने किवी फलंदाजांना हैराण करत त्याने कॉलिन डी ग्रँडहोम व केन विल्यमसन यांचा काटा काढला. डेथ ओव्हर्समध्ये शमी व बुमराह यांनी धावा आटवताना यजमानांना त्यांच्याच भूमीत धावांसाठी झगडायला भाग पाडले. दहाव्या षटकाअखेर २ बाद ७३ अशा सुस्थितीतून १६०च्या आसपास मजल मारण्यासाठी सज्ज झालेल्या न्यूझीलंडला तुटपुंज्या १३२ धावांवर समाधान मानावे लागले. कोहलीने रॉस टेलरला वैयक्तिक ११ धावांवर दिलेले जीवदान वगळता भारतीय मैदानी क्षेत्ररक्षकांची कामगिरी चांगली झाली.

धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. कोहली गो. ठाकूर ३३, कॉलिन मन्रो झे. कोहली गो. दुबे २६, केन विल्यमसन झे. चहल गो. जडेजा १४, कॉलिन डी ग्रँडहोम झे. व गो. जडेजा ३, रॉस टेलर झे. शर्मा गो. बुमराह १८, टिम सायफर्ट नाबाद ३३, मिचेल सेंटनर नाबाद ०, अवांतर ५, एकूण २० षटकांत ५ बाद १३२
गोलंदाजी ः शार्दुल ठाकूर २-०-२१-१, मोहम्मद शमी ४-०-२२-०, जसप्रीत बुमराह ४-०-२१-१, युजवेंद्र चहल ४-०-३३-०, शिवम दुबे २-०-१६-१, रवींद्र जडेजा ४-०-१८-२

भारत ः रोहित शर्मा झे. टेलर गो. साऊथी ८, लोकेश राहुल नाबाद ५७ (५० चेंडू, ३ चौकार, २ षटकार), विराट कोहली झे. सायफर्ट गो. साऊथी ११, श्रेयस अय्यर झे. साऊथी गो. सोधी ४४, शिवम दुबे नाबाद ८, अवांतर ७, एकूण १७.३ षटकांत ३ बाद १३५
गोलंदाजी ः टिम साऊथी ३.३-०-२०-२, हॅमिश बेनेट ३-०-२९-०, ब्लेअर टिकनेर ३-०-३४-०, मिचेल सेंटनर ४-०-१९-०, ईश सोधी ४-०-३३-१.