पाचव्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७३ धावांनी पराभव करत भारताने सहा सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद २७४ धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव ४२.२ षटकांत २०१ धावांत संपवला.
धावांचा पाठलाग करताना ऐडन मारक्रम (३२) व हाशिम आमला (३२) यांनी यजमानांना ५२ धावांची सलामी दिली. बुमराहने मारक्रमचा अडसर दूर केल्यानंतर पंड्याने जेपी ड्युमिनी (१) व एबी डीव्हिलियर्स (६) या महत्त्वाच्या शिलेदारांना बाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला.
हाशिम आमला याने यानंतर डेव्हिड मिलर (३६) याच्यासह चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी करत भारतावर पुन्हा दबाव टाकला. मिलरचा चहलने त्रिफळा उडविल्यानंतर पंड्याच्या थेट फेकीवर आमला धावबाद झाला. क्लासेनने यानंतर कुलदीपवर हल्ला चढवून संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, त्याचे प्रयत्न कमी पडले.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर भारताने रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. ३५व्या षटकाअखेर भारतीय संघ ३ बाद १९६ अशा भक्कम स्थितीत होता. शेवटच्या ९० चेंडूंत भारताला ४ गडी गमावून केवळ ७८ धावा जमवता आल्या. यामुळे तीनशे धावांचा टप्पा दृष्टिपथात असूनही भारताला तो ओलांडता आला नाही.
गचाळ क्षेत्ररक्षण
हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे याने ‘शॉर्ट पॉईंट’वर हाशिम आमलाचा झेल सोडला. यावेळी आमला ३८ धावांवर खेळत होता. आमलाने याचा पुरेपूर लाभ उठवत ७१ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार व सलामीवीर वैयक्तिक ऐडन मारक्रम याला श्रेयस अय्यर याने ९ धावांवर असताना जीवदान दिले. ३२ चेंडूंत ३२ धावा करून मारक्रम परतला.
धावफलक
भारत ः शिखर धवन झे. फेलुकवायो गो. रबाडा ३४, रोहित शर्मा झे. क्लासेन गो. एन्गिडी ११५, विराट कोहली धावबाद ३६, अजिंक्य रहाणे धावबाद ८, श्रेयस अय्यर झे. क्लासेन गो. एन्गिडी ३०, हार्दिक पंड्या झे. क्लासेन गो. एन्गिडी ०, महेंद्रसिंग धोनी झे. मारक्रम गो. एन्गिडी १३, भुवनेश्वर कुमारा नाबाद १९, कुलदीप यादव नाबाद २, अवांतर १७, एकूण ५० षटकांत ७ बाद २७४
गोलंदाजी ः मॉर्ने मॉर्कल १०-२-४४-०, कगिसो रबाडा ९-०-५८-१, लुंगी एन्गिडी ९-१-५४-४, आंदिले फेलुकवायो ८-०-३४-०, जेपी ड्युमिनी ४-०-२९-०, तबरेझ शम्सी १०-०-४८-०
दक्षिण आफ्रिका ः हाशिम आमला धावबाद ७१, ऐडन मारक्रम झे. कोहली गो. बुमराह ३२, जेपी ड्युमिनी झे. शर्मा गे. पंड्या १, एबी डीव्हिलियर्स झे. धोनी गो. पंड्या ६, डेव्हिड मिलर त्रि. गो. चहल ३६, हेन्रिक क्लासेन यष्टिचीत धोनी गो. कुलदीप ३९, आंदिले फेलुकवायो त्रि. गो. कुलदीप ०, कगिसो रबाडा झे. चहल गो. कुलदीप ३, मॉर्ने मॉर्कल पायचीत गो. चहल १, तबरेझ शम्सी झे. पंड्या गो. कुलदीप ०, लुंगी एन्गिडी नाबाद ४, अवांतर १७, एकूण ४२.२ षटकांत सर्वबाद २०१
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ७-०-४३-०, जसप्रीत बुमराह ७-०-२२-१, हार्दिक पंड्या ९-०-३०-२, कुलदीप यादव १०-०-५७-४, युजवेंद्र चहल ९.२-०-४३-२