भारताचा इंग्लंडवर ८ धावांनी विजय

0
135

>> मालिकेत २-२ अशी बरोबरी

>> सूर्यकुमार यादवचे अर्धशतक

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक व शार्दुल ठाकूर याने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या बळींमुळे भारताने चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात इंग्लंडचा ८ धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखत २-२ अशी बरोबरी साधली. भारताच्या ८ बाद १८५ धावांना उत्तर देताना इंग्लंडला निर्धारित २० षटकांत ८ बाद १७७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

धावांचा पाठलाग करताना जॉनी बॅअरस्टोव व बेन स्टोक्स यांनी चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. चहरने बॅअरस्टोवला बाद करत ही जोडी फोडली. डावातील १८वे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. या षटकात शार्दुलने बेन स्टोक्स व ऑईन मॉर्गन यांना बाद केले. शेवटच्या षटकात आर्चरने काही धाडसी फटके मारत भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. शार्दुलने दोन वाईड चेंडू टाकून यात भर टाकली होती. परंतु, यानंतरही भारताने निसटता विजय मिळविण्यात यश प्राप्त केले.
भारताने या सामन्यासाठी संघात दोन बदल करताना जायबंदी ईशान किशनच्या जागी सूर्यकुमार यादवचा तर लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या जागी लेगस्पिनर राहुल चहरला संधी दिली.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. व गो. आर्चर १२, लोकेश राहुल झे. आर्चर गो. स्टोक्स १४, सूर्यकुमार यादव झे. मलान गो. करन ५७, विराट कोहली यष्टिचीत बटलर गो. रशीद १, ऋषभ पंत त्रि. गो. आर्चर ३०, श्रेयस अय्यर झे. मलान गो. आर्चर ३७, हार्दिक पंड्या झे. स्टोक्स गो. वूड ११, शार्दुल ठाकूर नाबाद १०, वॉशिंग्टन सुंदर झे. रशीद गो. आर्चर ४, भुवनेश्‍वर कुमार नाबाद ०, अवांतर ९, एकूण २० षटकांत ८ बाद १८५
गोलंदाजी ः आदिल रशीद ४-१-३९-१, जोफ्रा आर्चर ४-०-३३-४, मार्क वूड ४-१-२५-१, ख्रिस जॉर्डन ४-०-४१-०, बेन स्टोक्स ३-०-२६-१, सॅम करन १-०-१६-१
इंग्लंड ः जेसन रॉय झे. यादव गो. पंड्या ४०, जोस बटलर झे. राहुल गो. कुमार ९, डेव्हिड मलान त्रि. गो. चहर १४, जॉनी बॅअरस्टोव झे. सुंदर गो. चहर २५, बेन स्टोक्स झे. यादव गो. ठाकूर ४६, ऑईन मॉर्गन झे. सुंदर गो. ठाकूर ४, सॅम करन त्रि. गो. पंड्या ३, ख्रिस जॉर्डन झे. पंड्या गो. ठाकूर १२, जोफ्रा आर्चर नाबाद १८, आदिल रशीद नाबाद ०, अवांतर ६, एकूण २० षटकांत ८ बाद १७७
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-१-३०-१, हार्दिक पंड्या ४-०-१६-२, शार्दुल ठाकूर ४-०-४२-३, वॉशिंग्टन सुंदर ४-०-५२-०, राहुल चहर ४-०-३५-२

रोहित पहिलाच भारतीय
डावातील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावणारा रोहित शर्मा हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने आदिल रशीदने टाकलेल्या डावातील पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पुढे सरसावत रोहितने षटकार ठोकला.
याबरोबरच हा षटकार रोहितचा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमधील भारतात मारलेला ५० वा षटकार ठरला. भारतात आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ५० षटकार ठोकणाराही तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली असून विराटने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ४८ षटकार भारतात मारले आहेत. तर या यादीत तिसर्‍या क्रमांकावर ३२ षटकारांसह युवराज सिंग आहे.

पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमारचा षटकार
सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. जोफ्रा आर्चरने टाकलेल्या डावातील चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर सूर्यकुमारने षटकार लगावला. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावणारा तो भारताचा पहिला खेळाडू बनला आहे. याआधी पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने भारताविरूद्ध २००७ साली षटकार ठोकला होता. तर द. आफ्रिकेच्या मांगेलिसो मोसेहले याने श्रीलंकेविरूद्ध २०१७ साली षटकार खेचला होता.