
>> कुलदीपचे ६ बळी, रोहितचे नाबाद शतक
टीम इंडियाने काल गुरुवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ८ गडी व ५९ चेंडू राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवने केवळ २५ धावांत ६ गडी बाद करत यजमानांंचे कंबरडे मोडले. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडचा डाव ४९.५ षटकांत २६८ धावांत संपवल्यानंतर भारताने विजयी लक्ष्य ४०.१ षटकांत गाठले.
जेसन रॉय व जॉनी बॅअरस्टोव यांनी इंग्लंडला १०.२ षटकांत ७३ धावांची खणखणीत सलामी देत मोठ्या धावसंख्येसाठी भक्कम पाया रचला. परंतु, कुलदीप गोलंदाजीस येताच साहेबांची गाडी रुळावरून घसरली. बिनबाद ७३वरून त्यांची ३ बाद ८३ अशी घसरगुंडी उडाली. चहलने मॉर्गनला बाद करत इंग्लंडला अधिक संकटात टाकते. आपल्या पन्नास धावांसाठी १०३ चेंडूंचा सामना केलेल्या बेन स्टोक्सने व जोस बटलर (५३) यांनी इंग्लंडला अडीचशे पार नेण्यास मदत केली. उमेशने ७० धावांत २ व चहलने ५१ धावांत १ गडी बाद केला.
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनने तुफानी फटकेबाजी करत २७ चेंडूंत ४० धावा चोपल्या. त्याच्या या खेळीमुळे रोहितला स्थिरावण्यासाठी वेळ मिळाला. विराटने यानंतर रोहितच्या साथीने दुसर्या गड्यासाठी १६७ धावांची भागीदारी केली. रशीदच्या गोलंदाजीवर यष्टिचीत होण्यापूर्वी कोहलीने आपले ४७वे अर्धशतक लगावताना ७५ धावा केल्या. ८२ चेंडूंत ७ चौकारांसह त्याने आपली खेळी सजवली. रोहित शर्मा ११४ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह १३७ धावा करून नाबाद राहिला. राहुलने नाबाद ९ धावांचे योगदान दिले. मालिकेतील दुसरा सामना शनिवार १४ रोजी खेळविला जाणार आहे.