भाडेकरूंची पडताळणी न केल्यास घरमालकांना दंड : महासंचालक

0
13

भाडेकरूंची पडताळणी घरमालकांना सक्तीची असून, जे घरमालक भाडेकरूंची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांना दंड ठोठावला जाणार आहे, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांनी काल दिला.

राज्यात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून भाडेकरूंची तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कागदपत्रांशिवाय वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीयांना ताब्यात घेऊन कारवाई केली जात आहे. राज्यातील चोरी व इतर प्रकरणांमध्ये परप्रांतीयांचा समावेश असतो. चोरी केल्यानंतर किंवा गुन्हा केल्यानंतर ते परराज्यात पळून जातात. चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे राज्यातील घरमालकांनी भाडेकरू ठेवताना त्या व्यक्तीची पोलिसांकडून पडताळणी करणे बंधनकारक आहे, असे पोलीस महासंचालक सिंग यांनी स्पष्ट केले.

राज्यात येत्या जुलै 2024 पासून नवीन तीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जात आहे. गोवा पोलीस नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारने फौजदारी कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. फौजदारी कायद्यातील कालबाह्य झालेली कलमे वगळण्यात आली असून सुधारित कलमांचा समावेश करण्यात आला आहे. फौजदारी कायद्यातील काही कलमांची व्याख्याही स्पष्ट करण्यात आलेली आहे, असे सिंग यांनी सांगितले.