>> त्रिकन्नाड आंतर शालेय क्रिकेट
मडगावच्या भाटिकर मॉडेल हायस्कूलने अंतिम सामन्यात फोंडाच्या आल्मेदा हायस्कूलचा ४९ धावांनी पराभव करीत मडगाव क्रिकेट क्लब आयोजित २०व्या मुकुंद त्रिकन्नाड स्मृती आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. भाटिकर मॉडेल हायस्कूलचे हे सलग सातवे जेतेपद होय.
प्रथम फलंदाजी करताना भाटिकर मॉडेल हायस्कूलने सनथ नेवगीच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ४० षट्कांत ९ गडी गमावत २०७ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना आल्मेदा हायस्कूलचा डाव १५८ धावांवर संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक ः भाटिकर मॉडेल स्कूल, ४० षट्कांत ९ बाद २०७, (सनथ नेवगी ११०, दीप कासवणकर ३२, विष्णू वॉरियर १७ धावा. साईश नाईक ३-३५, वेद पटेल २-५१, गौरांग गावकर २-३३ बळी) विजयी विरुद्ध आल्मेदा हायस्कूल, ३८.४ षट्कांत सर्वबाद १५८, (साईश नाईक ३६, नमिश शिरोडकर ३४, गौरांग गावकर २१, वेद पटेल नाबाद १७, शुभम शांडे १४ धावा. शुभम चेडे ३-४५, रोहन नाईक ३-१९, सनथ नेवगी व दीप कासवणकर प्रत्येकी १ बळी).
वैयक्तिक बक्षिसे ः उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – मीत पटेल (आल्मेदा) व शंतनू नेवगी (भाटिकर मॉडेल), उत्कृष्ट गोलंदाज – दीप कासवणकर (भाटिकर मॉडेल), उत्कृष्ट फलंदाज – व सामनावीर – सनथ नेवगी (भाटिकर मॉडेल), अंतिम सामन्यातील पराभूत संघाकडून केलेली उत्कृष्ट कामगिरी – गौरांग गावकर (आल्मेदा).
बक्षीस वितरण सोहळ्याला गोव्याचा माजी रणजी कर्णधार सगुण कामत याची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्याच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.