भाटकाराने पाणी, वीज जोडणीस विरोध केल्यास मुंडकारांनी पोलीस तक्रार करावी

0
2

मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आवाहन

एखादा जमीन मालक (भाटकार) जर आपल्या मुंडकाराला तो राहत असलेल्या घरासाठी वीज, पाण्याची जोडणी घेण्यास तसेच शौचालय बांधण्यास जर परवानगी देत नसेल तर सदर मुंडकाराने पोलिसात तक्रार नोंदवावी, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत सांगितले. पाणी तसेच शौचालय यासाठी वेगळ्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

काल आमदार प्रेमेंद्र शेट यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला हा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील भाटकार आपल्या मुंडकारांना खूप छळत असून त्यांच्या जमिनीत घर बांधून राहणाऱ्या मुंडकारांना ते वीज तसेच पाण्याची सोय तसेच शौचालय अशा मुलभूत गरजांसाठीही परवानगी देत नसल्याचा आरोप आमदार शेट यांनी केला. मुंडकारांना सगळे हक्क मिळावेत यासाठी आता सरकारने मुंडकार कायद्यात आवश्यक त्या सुधारणा घडवून आणाव्यात, अशी मागणीही यावेळी शेट यांनी केली.
यावेळी बोलताना महसूलमंत्री बाबुश मोन्सेर्रात यांनी, मुंडकार कायद्याखाली राज्यातील मुंडकारांना सगळे हक्क मिळत आहेत. त्यामुळे मुंडकार कायद्यात आणखी दुरूस्ती करण्याची कोणतीही गरज नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या 5 वर्षांच्या काळात मुंडकार कायद्याखाली 2500 खटले हातावेगळे करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मात्र, नवे नवे खटले दाखल केले जात असल्याने मुंडकार खटले वाढतच चालले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.