भाजी विक्रेत्या महिलेचे 2 लाखांचे मंगळसूत्र लंपास

0
9

>> नास्नोळा-बार्देश येथील रस्त्यालगत घडली घटना

बार्देश तालुक्यातील हळदोणा मतदारसंघात येणाऱ्या नास्नोळा येथे एका भाजी विक्रेत्या महिलेचे 2 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र काल चोरट्यांनी लांबवले. गायत्री ऊर्फ भागी शिरोडकर असे या महिलेचे नाव आहे. ती नास्नोळा येथे रस्त्याच्या बाजूला भाजी विक्री करीत होती, त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजी विक्रेती महिला ही नास्नोळा येथील रस्त्याच्या बाजूला भाजी विक्री करण्यासाठी बसली होती. यावेळी एका दुचाकीवरुन दोघेजण भाजी घेण्याच्या बहाण्याने तिच्याकडे आले आणि अचानक एकाने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले व दोघांनीही दुचाकीवरुन पळ काढला. गायत्री ऊर्फ भागी शिरोडकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हे मंगळसूत्र अंदाजे 2 लाख रुपयांचे आहे.

याबाबत म्हापसा पोलिसांत चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नास्नोळा येथील आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी हे पुढील तपास करीत आहेत.