भाजी उत्पादन १०० टनांवर नेणार : कृषिमंत्री

0
172

चालू वर्षी राज्यातील दैनंदिन भाजी उत्पादन ५ टनावरून १०० टनांवर नेण्याचे उद्दिष्ट कृषिखात्याने ठेवल्याची माहिती कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली.
गोव्याला रोज ४०० टन एवढी भाजी लागते. मात्र, गोव्यात केवळ ५ टन एवढीच भाजी पिकत असते. त्यामुळे आम्ही भाजीसाठी पूर्णपणे परराज्यांवर अवलंबून आहोत, मात्र, राज्यात कृषिक्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट असून भाजी उत्पादन रोज ५ टनांवरून १०० टनांवर नेण्याचे शिवधनुष्य पेलण्यास आपले कृषिखाते समर्थ असल्याचे कवळेकर यांनी स्पष्ट केले.

१५ जुलै २०१९ या दिवशी आपण कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर १५ ऑगस्ट २०१९ रोजी मडगाव येथील जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आपण कृषिक्षेत्रात क्रांती घडवून आणणार असल्याचे सांगितले होते आणि आता त्याच दिशेने आपली पावले पडत असल्याचे कवळेकर म्हणाले.
राज्यातील कृषीप्रधान असलेल्या काणकोण, केपे, सांगे, सत्तरी, पेडणे आदी तालुक्यांत जास्तीत जास्त युवकांना तसेच पारंपरिक शेतकर्‍यांना जास्तीत जास्त जमीन शेतीच्या लागवडीखाली आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहितीही कवळेकर यांनी दिली.

तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी त्यांना शेतीसाठी लागणारी सगळी अवजारे तसेच टॅक्टर्स, हार्वेस्टर याबरोबरच शेतीसाठी कुंपण उभारून देणे, पाण्याची सोय करणे आदीसाठी कृषिखात्यातर्फे पूर्ण सहकार्य केले जात आहे. गेल्या ११ महिन्यांत आपण शेतकर्‍यांच्या वेगवेगळ्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्याचे ते म्हणाले.

झाडांचे वितरण सुरू
आमदारांना झाडे देण्याचे काम यापूर्वीच सुरू झालेले असून यंदापासून १ हजारांऐवजी २ हजार झाडे आमदारांना देण्यात आली. त्यांच्या मतदारसंघासाठी त्यांना कोणती झाडे पाहिजेत ते विचारुन त्यानुसार त्यांना झाडे देण्यात येत असल्याचे कवळेकर म्हणाले.

१५०० किलो भाजीबियाणांचे वितरण
यंदा शेतकर्‍यांना १५०० किलो भाजी बियाणांचे वितरण करण्यात आले. गेल्या वर्षीपर्यंत ३०० किलो एवढी भाजी बियाणी त्यांना देण्यात येत असत. शेतकर्‍यांच्या सोयीसाठी लॉकडाऊनच्या काळातही राज्यातील सगळी विभागीय कृषी कार्यालये उघडी ठेवण्यात आल्याचे कवळेकर यांनी सांगितले.

कृषी अधिकार्‍यांशी चर्चा
राज्यातील सर्व विभागीय कृषी अधिकार्‍यांशी आपण आतापर्यंत तीन वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली असून त्यांना कृषिक्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्याचे ते म्हणाले.

मडगावात कारखाना
राज्यातील फणस, आंबा यांच्यासह विविध कृषी उत्पादनापासून पदार्थ तयार करण्यासाठी मडगाव येथील कृषी यार्डात कारखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही कवळेकर यांनी दिली.