गेल्या मार्च महिन्यात झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपचा त्याग करणे ही आपली मोठे चूक होती, असे काल कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून आपण ही चूक सुधारल्याचे लोबो म्हणाले. सुमारे १५ वर्षे आपण भाजपमध्ये होतो.
पण नंतर काही वरिष्ठ नेत्यांबरोबर आपले मतभेद झाल्याने आपण पक्षाचा त्याग करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अन्य काही नेत्यांचेही वरिष्ठांबरोबर मतभेद होते. मात्र, त्यांनी भाजप सोडला नाही. आपण मात्र पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि ती मोठी चूक होती असे आपणाला नंतर कळून चुकल्याचे ते म्हणाले. नगरनियोजन खात्याने तुमच्यावर केलेल्या कारवाईमुळे घाबरून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला हा आरोप किती खरा आहे असे विचारले असता त्यांनी आपण कुठेही गैरव्यवहार केले नव्हते असे स्पष्ट केले.