भाजप सरकारकडून गोव्याच्या पर्यटनाचा नाश : चोडणकर

0
11

निसर्गसुंदर अशा गोव्यातील पर्यावरणाचा नाश करण्याचे काम राज्यातील प्रमोद सावंत यांच्या सरकारने हाती घेतले असून त्यामुळे गोव्याच्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.
रेईश-मागुस येथे मांडवी नदीच्या तीरी दिल्लीस्थित एका वजनदार व्यक्तीने मातीचा भराव घालण्याचे काम हाती घेतलेले असताना गोवा सरकारने मात्र बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप काल चोडणकर यांनी केला.

ज्या रिसॉर्टच्या मालकाने काम हाती घेतले आहे. त्या रिसॉर्टच्या मालकावर सरकारने अजून कारवाई केलेली नाही याचे आपणाला आश्चर्य वाटत असून यावरुन हे बेकायदेशीर कृत्य करणारी व्यक्ती ही वजनदार आहे हे स्पष्ट होत असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.
राज्यातील कित्येक किनाऱ्यांची धूप होऊ लागलेली असतानाही सरकारने कोणतीही पावले उचलत नाही हे धेोक्याचे असल्याचे ते म्हणाले. राज्यातील डोंगर उद्ध्वस्त केल्यानंतर भाजपच्या भांडवलेशहीची वक्रदृष्टी राज्यातील मोकळ्या जागा व नद्यांच्या तीरांवर तसेच समुद्र किनाऱ्यांवर पडली असल्याचे चोडणकर म्हणाले.

किनारा बुजवण्याचे काम
साळगाव मतदारसंघातील रेईश-मागूस येथील मांडवी नदीच्या तीरावर मातीचा भराव घालून किनारा बुजवण्याचे काम चालू असल्याचे सांगून सीआरझेडचे उल्लंघन करून हे चालू असल्याचे सांगून सीआरझेडचे उल्लंघन करून हे चालू असल्याचे चोडणकर म्हणाले. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसून स्थानिक पंचायतीलाही काहीही कळवण्यात आले नसल्याचे चोडणकर म्हणाले.
सरकारने यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.