राहूल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी १२ तासात केलेल्या चार हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या टिकेचे लक्ष्य बनविले. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर काश्मीरमधील अतिरेकी कारवायांमध्ये वाढ झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ‘केंद्रात आमचे सरकार १० वर्षे सत्तेवर होते. या काळात पर्यटक काश्मीरमध्ये बिनधास्त येत होते. तेथे शांतता होती. मात्र जेव्हापासून त्यांचे (मोदींचे) सरकार केंद्रात सत्तेवर आले, तेव्हापासून अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या’ असा दावा राहूल यांनी येथील निवडणूक प्रचार सभेत बोलताना केला.
‘निवडणुकांदरम्यान ते (मोदी) जेथे जातात., मग ते महाराष्ट्र, दिल्ली किंवा उत्तर प्रदेश असो तेथे हिंसाचार होतोच. एका धर्माचे लोक दुसर्या धर्माच्या लोकांशी भिडतील याची व्यवस्था ते करतात आणि त्यानंतर निवडणुका होतात’ असा आरोपही त्यांनी केला.
त्याआधी राहूल गांधी यांनी शुक्रवारी काश्मिरात झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याचा कठोरतेने निषेध केला. अशा हल्ल्यांद्वारे देशात अस्थिरता माजविण्याच्या प्रयत्नांचा कठोरपणे बिमोड करायला हवा असे ते म्हणाले. श्रीनगर येथे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक प्रचार सभा होणार आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतर चीन व पाकिस्तान यांना धडा शिकवू अशा वल्गना लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी करीत होते, त्याचे काय झाले? सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसात विदेशातील भारतीयांचा काळा पैसा आणण्याच्या दाव्याचे काय झाले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. त्यांची आश्वासने फसवी होती असे ते म्हणाले.