भाजप सत्तेत आल्यास बंगालात कायद्याचे राज्य येईल ः मोदी

0
88

भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर पश्‍चिम बंगालात पुन्हा एकदा कायद्याचे राज्य येईल. तसेच अत्याचार करणार्‍या प्रत्येकावर कारवाई केली जाईल असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी पुरुलिया येथे प्रचारसभेला संबोधित करताना तृणमूल कॉंग्रेस तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली.

ममता दीदींनी पश्चिम बंगालची वाईट अवस्था करुन ठेवल्याचा आरोपही मोदींनी केला. गुन्हे आहेत, गुन्हेगार आहेत, माफिया आहेत, घुसखोरी करणारे आहेत मात्र ते मोकाट फिरत आहेत. सिंडिकेट आहेत, घोटाळे आहेत मात्र त्यांच्यावर ममतांच्या राज्यात कोणतीच कारवाई केली जात नाही, असे मोदी म्हणाले. आता येथील जनतेने संघटितपणे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या स्वप्नातील बंगला पुन्हा घडवण्याची गरज असल्याचे आवाहनही मोदी यांनी केले.