>> जाहीरनाम्यात आश्वासन; सवलतीच्या दरात गृहकर्ज देणार; इंधनावरील कर न वाढवण्याचीही ग्वाही
भाजपच्या विधानसभा निवडणूक संकल्प पत्राचे प्रकाशन केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आले. या संकल्पपत्रात २२ संकल्प करण्यात आले असून, वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत, सवलतीच्या दरात गृहकर्ज, तीन वर्षे इंधनावरील करवाढ टाळणार, यासह ६ महिन्यांत खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलिंडर दिले जातील. पात्र कुटुंबांतील महिलांना २ टक्के, तर पुरुषांना ४ टक्के व्याजदराने गृहकर्ज दिले जाईल. तसेच निवासी भूखंड विकसित करून पाच वर्षांत चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून दिली जातील. पेट्रोल व डिझेलवरील राज्याचा कर वाढवला जाणार नाही, अशी हमी जाहीरनाम्यात देण्यात आली आहे.
पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवीन होम स्टे योजना सुरू केली जाईल. होम स्टे सुविधा देऊ इच्छिणार्या स्थानिकांना ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज आणि प्रशिक्षण उपलब्ध केले जाईल. स्थानिक युवकांना रोजगार देणार्या उद्योजकांना पाच हजार दरमहा अनुदान दिले जाईल. साहसी खेळ आणि समुद्र किनार्याभोवती सध्याच्या पायाभूत सुविधांंमध्ये वाढ केली जाईल. पर्यटन क्षेत्राला चालना देऊन गोव्याला संमेलने आणि प्रदर्शनांचे आशियातील केंद्र बनवू, अशी आश्वासने देखील देण्यात आली आहेत.
पाच वर्षात राज्यातील बहुस्तरीय गरिबीचे पूर्णपणे निर्मूलन केले जाईल. तसेच गोव्यात दर्जेदार खेळाडू निर्मितीसाठी मिशन सुवर्ण किनारा योजना कार्यान्वित केली जाईल. राज्यात नवीन आंतररष्ट्रीय फुटबॉल मैदान आणि फुटबॉल अकादमीची स्थापना केली जाईल. गोव्याचे आरोग्य आणि उच्च तंत्रज्ञान संशोधनाचे केंद्र बनवले जाईल. युवा वर्गाला स्वंयपूर्ण बनविण्यासाठी युवा पदवीधारकांना शिकाऊ प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रशिक्षण काळात ५ हजार विद्यावेतन दिले जाईल. राज्य आरोग्य सेवेत आंतरराष्ट्रीय संरक्षण दर्जाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल. तसेच कुपोषण निर्मूलन केले जाईल, अशी आश्वासने नमूद केलेली आहेत.
शेतकर्याचे उत्पादन दुप्पट वाढविण्याच्या व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच २० कोल्ड स्टोरेज सेंटर स्थापन केली जातील. राज्यातील मासेमारी व्यवसायाला प्रोत्साहन दिले जाईल. महिलांचे सबलीकरण करून पुढील १० वर्षात महिला कर्मचार्यांचा सहभाग वाढविण्याचे ध्येय आहे. पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकांना खास सुविधा उपलब्ध केल्या जातील, अशी आश्वासने सुद्धा देण्यात आली आहेत.
पंतप्रधानांची उद्या म्हापशात सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार दि. १० फेब्रुवारी रोजी गोव्यात येणार असून, म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरासमोरील जागेत त्यांची सभा होणार आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी हे दि. ११ रोजी सभा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र आता ही सभा एक दिवस अगोदरच होणार आहे.
जाहीरनाम्यातील महत्त्वाची आश्वासने
- – राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलिंडर दिले जातील.
- – पात्र कुटुंबांतील महिलांना २ टक्के, तर पुरुषांना ४ टक्के व्याजदराने गृहकर्ज दिले जाईल.
- – पेट्रोल व डिझेलवरील राज्याचा कर वाढवला जाणार नाही.
- – बेरोजगार युवकांना पाच हजारांचा भत्ता दिला जाईल.
- – सहा महिन्यात गोवा खनिज विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू केला जाईल.
- – मनोहर पर्रीकर कल्याण निधीची स्थापना करून प्रत्येक पंचायतीसाठी ३ कोटींपर्यंतचा आणि प्रत्येक नगरपालिकेसाठी ५ कोटींपर्यंतचा विकासनिधी उपलब्ध केला जाईल.
- – दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तिवेतन दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत वाढवले जाईल.
- – गोव्याला पुढील १० वर्षात ५० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी योग्य पावले उचलण्यात येतील.
स्थैर्य अन् विकासासाठी भाजपला विजयी करा
>> केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
स्थैर्य आणि विकासासाठी भाजपला विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या संकल्प पत्राच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना काल केले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर आदी उपस्थित होते. आगामी काळात पेट्रोलचे महत्त्व कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर ८० रुपयांवर ठेवण्याचे आश्वासन देऊन कॉँग्रेसकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका गडकरी यांनी केली.