भाजप लवकरच निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष

0
3

> > फेब्रुवारी अखेरपर्यंत बदल पाहायला मिळणार; पक्षांतर्गत निवडणुकांना सुरुवात

एप्रिल व मे महिन्यात देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही. 400 पारचा नारा दिलेल्या भाजपाला अवघ्या 240 जागा मिळाल्या. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वातील कामगिरी असमाधानकारक राहिल्याने आता नवा अध्यक्ष निवडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पक्षांतर्गत निवडणुकांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर नव्या अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. नव्या वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2025 च्या शेवटापर्यंत भाजपमध्ये हा बदल झालेला पाहावयास मिळेल.

भाजपमध्ये पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. बूथ पातळीवर, जिल्हा आणि विभाग पातळीवर जे प्रमुख निवडायचे आहेत, त्यांचीही निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. लवकरच केंद्रीय नेतृत्वाकडून विविध राज्यांतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष निवडले जातील. त्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाईल.
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तम कामगिरी केली. लोकसभा निवडणुकीत हात पोळले गेल्यानंतर संघ आपल्याला कशी मदत करू शकतो हे भाजपला समजले. कारण लोकसभा निवडणुकीच्या आधी विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आम्हाला आता संघाशिवाय वाटचाल करायला आम्ही सक्षम आहोत, असे विधान केले होते. ज्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. ज्यानंतर शहाणे होत भाजपने संघाची मदत घेतली. त्यानंतर संघ काय किमया घडवू शकतो हे महाराष्ट्रात दिसले. भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत, तर महायुतीला 237 जागा मिळाल्या.
आता नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार आहे. नव्या अध्यक्षांच्या निवडीवर नरेंद्र मोदींची छाप असणार आहे यात काही शंका नाही. मोदी आणि अमित शहा यांच्याकडून कुणाची निवड होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशाच व्यक्तीची निवड करतील ज्याला संघाची वैचारिक पार्श्वभूमी असणार आहे.

जे. पी. नड्डांना जेव्हा निवडण्यात आले होते, तेव्हा संघानेही त्यांना पाठिंबा दिला होता. कारण 2019 मध्ये भाजपला उत्तम यश मिळाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी, शहा आणि संघ परिवार यांच्याकडून अशाच माणसाची निवड होईल ज्या व्यक्तीला संघाची योग्य पार्श्वभूमी असणार आहे. त्यामुळे हा चेहरा कुणाचा असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड 31 जानेवारीपर्यंत शक्य

भाजपच्या नव्या गोवा प्रदेश अध्यक्षांची निवड येत्या 31 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता काल भाजपमधील सूत्रांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना व्यक्त केली.
पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू असून, पक्षाचे बुथ, मंडळ व जिल्हा अध्यक्ष यांची निवड व्हायची आहे. ही प्रक्रिया येत्या 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की नंतर नव्या प्रदेश भाजप अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्याने दै. ‘नवप्रभा’शी बोलताना काल दिली.

अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसंबंधी अधिक माहिती विचारली असता ते म्हणाले की, प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी एकूण सहा नेत्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात एक माजी खासदार व पाच माजी आमदार यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या यादीत दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, नरेंद्र सावईकर, विश्वास सतरकर व दामू नाईक या सहा जणांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर विद्यमान प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचीही या पदावर फेरनिवड होऊ शकते, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली. पक्षाचे केंद्रीय नेतेच याप्रकरणी योग्य विचार करुन निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.