भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीवर चर्चा काल करण्यात आली. येत्या 7 जानेवारीपर्यंत भाजपच्या 36 मंडळ समिती अध्यक्षांची निवड जाहीर केली जाणार आहे. तसेच, जानेवारीच्या अखेरीस नूतन प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाणार असून, 6 नावांची शिफारस भाजपच्या केंद्रीय समितीकडे करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
उत्तर गोव्यातील 20 मतदारसंघ आणि दक्षिण गोव्यातील 16 मतदारसंघात मंडळ अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. भाजप मंडळ समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रत्येक मतदारसंघातून दोन, तीन किंवा चार नावेही आली आहेत. असे असले तरी मंडळ समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध केली जाणार आहे. भाजप जिल्हा अध्यक्षांची निवड 10 ते 15 जानेवारी दरम्यान केली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
भाजपचे केंद्रीय पातळीवरील नेते अरुण सिंह हे संघटनात्मक निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी 5 जानेवारीला गोव्यात येत आहेत, असेही तानावडे म्हणाले.
भाजपच्या मंडळ समितीच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. मंडळ अध्यक्षपदासाठी 45 वर्षे या वयाच्या अटीमुळे अनेक जुने भाजप कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. मंडळ समितीच्या इतर पदासाठी वयाची अट नाही, असे तानावडे यांनी सांगितले. गाभा समितीच्या बैठकीत संघटनात्मक निवडणुकीच्या विषयांबरोबर राज्यातील आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीवर चर्चा करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री माविन गुदिन्हो, दामू नाईक, रमेश तवडकर, गोविंद पर्वतकर, दिगंबर कामत, बाबू कवळेकर, विनय तेंडुलकर, नीलेश काब्राल यांची उपस्थिती होती.
गाभा समितीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदासाठी 6 नावांची शिफारस केंद्रीय समितीकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय पातळीवरून प्रदेशाध्यक्षांची निवड जाहीर केली जाणार आहे, असेही सदानंद तानावडे यांनी सांगितले.