भाजप प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज स्वीकारणार

0
4

अध्यक्षांची उद्या घोषणा, म्हांबरे यांची माहिती

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज शुक्रवार दि. 17 जानेवारी रोजी स्वीकारण्यात येणार असून उद्या शनिवार दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता गोमंतक मराठा समाज संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नूतन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची रीतसर घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती काल भाजपचे राज्य निवडणूक अधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत
दिली.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीतील प्रदेशाध्यक्षाच्या निवडीची प्रक्रियेसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांचे आज शुक्रवारी गोव्यात आगमन होणार आहे. त्यानंतर भाजपच्या गाभा समितीची बैठक घेतली जाणार आहे. या गाभा समितीमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे, असे म्हांबरे यांनी सांगितले.
भाजपची संघटनात्मक निवडणूक आतापर्यंत बिनविरोध झालेली आहे. मडकई, नुवे, बाणावली आणि वेळ्ळी या चार मतदारसंघात भाजपच्या गटाध्यक्षाची निवड प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित केलेल्या नावाची माहिती भाजपच्या गाभा समितीला दिली जाणार आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विद्यमान सरचिटणीस दामू नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.