भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर, माजी आमदार दामू नाईक व माजी आमदार दयानंद सोपटे ही तीन नावे चर्चेत असल्याची माहिती काल भाजपमधील सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली. नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत होणार असल्याचे भाजपने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षसाची निवड ही डिसेंबर महिन्यातच होणार होती. पण काही कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रानी स्पष्ट केले. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका अजून पूर्ण झालेल्या नसून त्या अजूनही सुरू आहेत हे त्यापैकी एक कारण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
पक्ष सदस्य संख्या चार लाखांवर
राज्यातील भाजप सदस्य संख्या ही चार लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले होते. ते उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचेही सूत्रानी स्पष्ट केले. दरम्यान, पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरू झालेली असून सर्वप्रथम बूथ समित्यांची निवड होणार आहे. त्यानंतर मंडळ व जिल्हा समित्यांची निवड होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया प्रदेशाध्यक्षाच्या निवडीने पूर्ण होणार असल्याने सूत्रानी स्पष्ट केले. भाजपची संघटनात्मक निवडणूक लोकशाही पद्धतीने होणार असून बूथ स्तरापासून या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येणार आहे. मंडळ व जिल्हा समित्यांचीही निवडणूकही त्याच पद्धतीने होणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.