भाजप पक्षश्रेष्ठींसमोर एकनाथ शिंदेंचे

0
4

>> मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला; आता महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रही; मुख्यमंत्री भाजपचाच होणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी आग्रह धरला होता. यानंतर काल एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतर आपली भूमिका मांडली. सत्ता स्थापनेबद्दल भाजपचे नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला आणि माझ्या पक्षाला मान्य असेल, असे शिंदे म्हणाले. शिंदेंनी घेतलेल्या पवित्र्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यात जमा आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सत्ता स्थापनेबद्दल निर्णय घ्यावा. त्याला आमचा पाठिंबा असेल. आमच्यामुळे त्यात कोणतीही बाधा येणार नाही. भाजप नेतृत्त्वाने महायुतीसाठी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल, असे शिंदे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. एकीकडे शिवसेनेचे नेते मुख्यमंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही असताना दुसरीकडे शिंदेंनी मात्र भाजपचा निर्णय मान्य असेल, अशी भूमिका घेतली आहे.
महायुतीत सत्ता स्थापनेबद्दल काही महत्त्वाचे निर्णय झाल्यानंतर शिंदेंनी ही पत्रकार परिषद घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली. ह्या पत्रकार परिषदेपूर्वी सत्ता स्थापनेच्या दृष्टीने काल दिल्लीत महत्त्वाच्या गाठीभेटी झाल्या.

सुत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या शिवसेनेला महायुतीच्या नव्या सरकारमध्ये महत्त्वाची खाती मिळू शकतात. शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळेल हे निश्चित आहे. या पदावर शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याची वर्णी लागू शकते. याशिवाय शिवसेनेने महायुतीच्या दुसऱ्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची मागणी केली आहे.

कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे?
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले. 2 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत चर्चा रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे, तर शिंदेंच्या शिवसेनेला 10-12, तर अजित पवार गटाला 7-9 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.