भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

0
13

भाजप नेत्या व हिमाचल प्रदेशमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली फोगट (४२) यांचे हणजूण येथील एका हॉटेलात काल सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सोनाली फोगट यांचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील शवागारात ठेवण्यात आला असून, शवचिकित्सेनंतरच त्यांचा मृत्यू हा हृदयविकारानेच झाला की अन्य कोणत्या कारणाने हे स्पष्ट होणार आहे. प्रथमदर्शनी त्यांच्या मृत्यूची नोंद ही अनैसर्गिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

सोनाली फोगट या काही दिवसांपूर्वी आपली मुलगी व अन्य काही कर्मचार्‍यांसह गोव्यात आल्या होत्या. त्या हणजूण येथील एका हॉटेलात वास्तव्यास होत्या. त्यांना काल सकाळी हणजूण येथील एका इस्पितळात दाखल करण्यात आले असता, तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मुलगी यशोधरा फोगट (१५) व तिचे पीए सुधीर सांगवान हेही त्यांच्यासोबत गोव्यात आले होते. त्या एका नाईट क्लबमध्ये गेल्याचीही चर्चा असून, पोलीस त्याबाबत तपास करीत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या निधनाबद्दल कळवण्यात आले असून, कुटुंबीय हिस्सार येथून गोव्यात येणार आहेत. त्यानंतरच मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सोनाली फोगट यांच्या मृतदेहाची चिकित्सा करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या एका पथकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारे एक पत्र हणजूण पोलिसांनी गोमेकॉच्या फोरॅन्सिेक मेडिसीन विभागाला दिले आहे.