भाजप नेत्यांविरुद्ध काँग्रेसकडून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी

0
5

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने काल मतदानाच्या दिवशी भाजप नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या.

काँग्रेसने भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांच्याविरूद्ध मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदविली आहे. सिद्धेश नाईक हे काल मतदानाच्या दिवशी पणजी मतदारसंघातील सांपेंद्रू रायबंदर येथील सरकारी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात ‘मोदी वन्स मोअर 2024′ असे लिहिलेले टी-शर्ट परिधान करून आले होते व हा आचार संहितेचा भंग असल्याचे काँग्रेसने लेखी तक्रारीतून नमूद केले आहे.

त्याशिवाय काँग्रेसने कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, तसेच भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्याविरुद्धही आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार नोंदविली. श्रीपाद नाईक यांनी काल मतदानाच्या दिवशी दुपारी 12.8 वाजता ‘एक्स’ ह्या सोशल मीडिया साईटवरून भाजपला मतदानाचे आवाहन केल्याचे काँग्रेसने तक्रारीत म्हटले आहे.

‘आयनॉक्स’विरुद्धही तक्रार
काँग्रेस पक्षाने ‘आयनॉक्स’ कंपनीविरुद्धही निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदविली आहे. काल मतदानाच्या दिवशी पर्वरी येथील आयनॉक्स चित्रपट गृहात दुपारी 12.40 वाजता भाजपची जाहिरात दाखवण्यात आली होती, असे गोवा प्रदेश काँग्रेस समितीने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. हळदोणे मतदारसंघात भाजपचे उत्तर गोवा जिल्हा उपाध्यक्ष फ्रेन्की काव्हार्लो हे रोख रक्कम असलेली कागदी पाकिटे मतदारांना देत होते. मात्र, भरारी पथके आल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढल्याचे काँग्रेसने लेखी तक्रारीतून नमूद केले आहे.