भाजप देशभरात 11 कोटी सदस्य नोंदणी करणार

0
7

>> ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी यांची माहिती

भाजपची राष्ट्रीय स्तरावर सदस्यता नोंदणी मोहीम सुरू असून पक्षाने देशभरात 11 कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती काल भाजपचे ज्येष्ठ नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी काल पत्रकार परिषदेतून बोलताना दिली. या घडीला भाजप सदस्यांची संख्या ही तब्बल 4 कोटी एवढी असल्याचे सांगितले.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर देश प्रगतीपथावर गेल्याचा दावा चौधरी यांनी पुढे बोलताना केला. ‘अब देश आगे बढ रहा है’, असे सांगून आता रशिया व युक्रेन या देशांमधील युद्ध थांबावे यासाठी तडजोडीची जबाबदारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, असा प्रस्ताव आलेला आहे असे सांगून मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे देशाचे नाव मोठे झाले असल्याचा दावाही चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला.

पक्षाने गरज असेल तेव्हा अन्य पक्षांशी युती करून सरकार स्थापन करण्याचे काम केले. मात्र तसे करताना कधीही आपल्या विचारधारेशी तडजोड केली नाही, असे ते म्हणाले.

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त काल सम्राट चौधरी यांनी त्यांना येथील भाजप कार्यालयात पुष्पांजली वाहिली. तद्नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेला प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व दामू नाईक उपस्थित होते.