>> कॉंग्रेस महाअधिवेशन समारोपात राहुल गांधी यांची टीका
भाजप एका संघटनेचा तर कॉंग्रेस देशाचा आवाज आहे. भाजप आणि संघ कौरवांप्रमाणे सत्तेसाठी लढत आहे, तर कॉंग्रेस पक्ष पांडवांप्रमाणे सत्यासाठी लढत असल्याची प्रखर टीका राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात केली.
आपल्या घणाघाती भाषणात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. मोदी हे आडनाव भ्रष्टाचाराची ओळख बनले असून ते नीरव, ललित आणि पंतप्रधानांच्या हातमिळवणीचे प्रतीक बनले आहे अशी टीका करत पंतप्रधान मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच संघावर निशाणा साधला. खर्या गोष्टी पंतप्रधानांना सांगितल्यावर ते सर्जिकल स्ट्राईक्स, नोटाबंदीची उदाहरणे देत दुसरीकडे लक्ष वळवतात. बेरोजगारी वाढलेली असताना पंतप्रधान बेरोजगार तरुणांना इंडिया गेटवर योगा करायला या असे आवाहन करतात, अशी खिल्ली उडवत राहुल गांधींनी मोदी सरकारचा समाचार घेतला.
भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मात्र, दुसरीकडे देशात रोजगारच उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. देशातील तरुणांना भेडसावणारा रोजगाराचा प्रश्न सोडवण्याची क्षमता फक्त कॉंग्रेसमध्येच असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी तरुणांना सत्ता बदल करावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना न दुखावता त्यांच्यातील व तरुण कार्यकर्त्यांमधील भिंत तोडण्याचे पहिले काम आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देश बदलण्याची ताकद मोदी किंवा इतर कोणामध्ये नसून ती केवळ तरुणांमध्येच असल्याचे राहुल म्हणाले.