>> सांताक्रूझ मतदारसंघात घेतली प्रचारसभा
भाजप आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी गोव्याला केवळ लुटण्याचे काम केले आहे. गोव्याच्या विकासासाठी त्यांनी काहीच केलेले नाही. गोव्याच्या विकासासाठी बदलाची नितांत गरज आहे. दिल्ली सरकारच्या धर्तीवर गोव्याचा विकास केला जाईल, अशी ग्वाही आपचे राष्ट्रीय समन्वयक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल दिली.
सांताक्रूझ मतदारसंघातील आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ऍड. अमित पालेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
गोवा सरकार २४ हजार कोटींच्या कर्जाखाली आहे. राज्यात नवीन विद्यालये, विद्यापीठ उभारली नाहीत, नवीन हॉस्पिटल नाही. चांगले रस्ते नाहीत. त्यामुळे राज्यात विकास कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
गोव्यात प्रामाणिक सरकार स्थापन करण्याची एक संधी द्यावी. गोव्यात गैरव्यवहार, भ्रष्टाचार करणार्यावर कारवाई केली जाणार आहे. गोव्यातील जनतेला मोफत वीज दिली जाईल. तसेच बेरोजगारांना भत्ता, महिलांना मानधन दिले जाणार आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. या सभेपूर्वी केजरीवाल यांनी उत्तर गोव्यातील मये, पर्ये मतदारसंघात आयोजित जाहीर प्रचारसभांत सहभाग घेतला.