पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा भाजपचा उमेदवार दि. १२ रोजी अधिकृतरित्या जाहीर करण्याचे निश्चित झाल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात आल्यानंतरच उमेदवाराची निवड जाहीर करण्याचे पक्षाने ठरविले आहे. सिद्धार्थ कुंकळकर यांचे नाव पक्षाने यापूर्वीच निश्चित केले आहे. पर्रीकर यांचा त्यांना सक्रिय पाठिंबा असल्याने त्यांना निवडून आणणे सोपे होईल, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अद्याप निवडणुकीची तारीख आयोगाने जाहीर केलेली नाही.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीबरोबर म्हणजे फेब्रुवारी दरम्यान येथील पोट निवडणूक होईल. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. सध्या पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम जोरात सुरू असल्याने त्याचाही लाभ भाजपला होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.