भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल

0
9

मडगाव आणि पणजीत घडवले शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्री, आमदारांसह नेते अन्‌‍ कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार पल्लवी धेंपो आणि भाजपचे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने भाजपने मडगाव आणि पणजीत शक्तिप्रदर्शन घडवले. पहिल्यांदा काल सकाळी पल्लवी धेंपो यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांच्याकडे उमेदवारी अर्ज काल सादर केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप मुख्यालय, श्री महालक्ष्मी देवस्थान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मंत्री रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, गोविंद गावडे, नीळकंठ हर्ळणकर, आमदार मायकल लोबो, जेनिफर मोन्सेरात, केदार नाईक, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, डॉ. दिव्या राणे, डिलायला लोबो, डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट, मगोपचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक, भाजपचे उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिध्देश नाईक व इतरांची उपस्थिती होती.
भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या मुख्यालयाबाहेर सभा घेतली. यावेळी श्रीपाद नाईक, सदानंद शेट तानावडे, रोहन खंवटे, गोविंद गावडे, डिलायला लोबो यांची भाषणे झाली.

आपण मतदारसंघातील विकासकामांबद्दल पुन्हा बोलणार नाही. गेल्या 25 वर्षांत केलेल्या विकासाचा अहवाल येत्या दोन दिवसांत लोकांच्या हाती ठेवणार आहे, असे भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
माझे कार्यकर्ते, गोव्याची जनता यांनी माझ्यावर वेळोवेळी दाखवलेल्या विश्वासामुळे सतत पाच वेळा निवडून येणे शक्य झाले आहे. भाजपने नेहमीच राष्ट्राच्या विचाराला प्राधान्य दिले आहे. भाजपने केलेला विकास मोजता येणार नाही. राज्याच्या विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही नाईक यांनी केले.

काँग्रेसचे उमेदवार आज भरणार अर्ज

काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमाकांत खलप (उत्तर गोवा) व विरियातो फर्नांडिस (दक्षिण गोवा) हे आपले उमेदवारी अर्ज आज (दि. 17) रामनवमीच्या मुहूर्तावर दाखल करणार आहेत. दरम्यान, आज रामनवमीनिमित्त गोवा सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली असली तरी लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज भरुन सादर करता यावेत, यासाठी उत्तर व दक्षिण्ा गोवा जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालये तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी, उत्तर गोवा व दक्षिण गोवा यांची कार्यालयेही आज खुली राहतील. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे उमेदवार मनोज परब (उत्तर गोवा) व रुबर्ट परेरा (दक्षिण गोवा) हे 18 एप्रिल रोजी आपले उमेदवारी अर्ज भरणार आहेत.