भाजप-अभाअद्रमुक युतीची घोषणा

0
2

>> आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी चेन्नईमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप आणि अभाअद्रमुक युतीची घोषणा केली. दोन्ही पक्ष पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र लढवतील. जागांचे वाटप चर्चेनंतर ठरवले जाईल, असे शहांनी यावेळी सांगितले.

तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना पदावरून काढून टाकल्यानंतर लगेचच राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष अद्रमुकने देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये परतण्याची घोषणा केली. सप्टेंबर 2023 मध्ये, भाजपचे तत्कालीन तामिळनाडू प्रमुख अन्नामलाई यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे अभाअद्रमुक एनडीएपासून वेगळे झाले होते.

काही मुद्द्यांवर अभाअद्रमुकची वेगवेगळी भूमिका आहे. पण आपण बसून यावर चर्चा करू आणि गरज पडल्यास एक कॉमन मिनिमम प्रोग्राम देखील तयार करू, असेही शहांनी यावेळी स्पष्ट केले. 2021 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत, द्रमुकने राज्यातील एकूण 234 जागांपैकी 133 जागा जिंकल्या होत्या. द्रमुक आघाडीने एकूण 159 जागा जिंकल्या. एनडीए युतीला फक्त 75 जागा जिंकता आल्या. अभाअद्रमुकला 66 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या, तर इतर पक्षांना 5 जागा मिळाल्या होत्या.

भाजप सरकारमध्ये सहभागी होईल की नाही हे निवडणुकीनंतर ठरवेल. अभाअद्रमुकने कोणतीही मागणी केलेली नाही आणि भाजपकडून त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही. ही युती दोन्ही पक्षांसाठी उपयुक्त आहे आणि आम्ही एकत्र निवडणुका लढवू. मंत्र्यांची संख्या आणि जागावाटपाबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. सध्या, एनडीएचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील भ्रष्ट द्रमुक सरकारला हटवणे हे आहे, असे अमित शहा म्हणाले.