भाजपा सत्तेवर आल्यास ३ महिन्यांत लोकायुक्त

0
68

अण्णा हजारे यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ काल भाजपने आझाद मैदानावर आयोजित केलेल्या धरणे कार्यक्रमात बोलताना पर्रीकर यांनी वरील घोषणा केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, दिगंबर कामत यांनी गेल्या चार वर्षांपासून लोकायुक्त विधेयक अडवून ठेवले आहे. या विधेयकात एक छोटीशी दुरुस्ती करण्याची गरज असून ती करून ते संमत करणे शक्य असताना दिगंबर कामत यांनी मात्र ते अडवून ठेवणेच पसंत केले असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्यापासून राज्यातील सर्व मंत्री भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. बेकायदा खाणींना तर राज्यात ऊत आलेला आहे, असे ते म्हणाले.

अण्णा हजारे व त्याच्या समर्थक सदस्यांनी मिळून तयार केलेले जनलोकपाल विधेयकच संसदेत संमत व्हायला हवे, तसेच लोकपाल कोण असेल याकडेही खास लक्ष द्यावे लागणार असल्याचे पर्रीकर म्हणाले.

गोव्यातून ४९ हजार कोटी रु. एवढा काळा पैसा नेऊन स्वीस बँकेत ठेवण्यात आला असल्याचे यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.

भाजपप्रमाणेच अन्य राजकीय पक्षांनीही भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची गरज असल्याचे सतीश सोनक यांनी यावेळी सांगितले.

राजेंद्र आर्लेकर, नरेंद्र सावईकर, प्रदीप शेट, दयानंद मांद्रेकर, ऍड. ज्युविनो डिसोझा, प्रकाश वेळीप आदींचीही यावेळी भाषणे झाली. सर्वांनी भाषणातून केंद्रातील सरकारवर तोफ डागली.