पणजी (प्रतिनिधी)
उपसभापती मायकल लोबो यांनी मंत्रिपद हुकल्याने मुख्यमंत्री आणि भाजपच्या पदाधिकार्यांवर सुरू केलेल्या टीकेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी संताप व्यक्त करून उपसभापती मायकल लोबो यांच्यावरच जोरदार प्रतिहल्ला केला आहे. मायकल लोबो केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप करीत आहेत. लोकांना आश्वासन देणार्याने प्रथम आश्वासनाची अंमलबजावणी केली पाहिजे, असे तेंडुलकर म्हणाले. मायकल लोबो यांनी मागील डिसेंबर महिन्यात टूरिस्ट टॅक्सी मालकांच्या आंदोलनाच्या वेळी प्रश्न न सुटल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. परंतु, टॅक्सी मालकांचा प्रश्न अजून सुटलेला नाही. तसेच लोबो यांनी आपल्या आश्वासनाचे पालन करून राजीनामा सुध्दा दिलेला नाही. आता, खाण अवलंबितांच्या धरणे आंदोलनाच्या वेळी प्रश्न न सुटल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे. लोबो यांच्याकडून आंदोलन करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यावेळी आमदारकीचा राजीनामा देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु, आश्वासनाचे पालन करीत नाहीत, असा टोला प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी हाणला.
लोकप्रतिनिधीने दिलेल्या आश्वासनाचे पालन न केल्यास लोकांचा विश्वास उडू शकतो. त्यामुळे आश्वासनाचे पालन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
भाजपात लोबोंपेक्षा
अनेक ज्येष्ठ आमदार
भाजपमध्ये मायकल लोबो पेक्षा अनेक ज्येष्ठ आमदार कार्यरत आहेत. केवळ पक्षाच्या आदेशामुळे ज्येष्ठ गप्प आहेत. सभापती डॉ. प्रमोद सावंत बालपणापासून भाजपचे कार्य करीत आहेत. त्यांची सुद्धा मंत्रिपदावर वर्णी लावण्यात आलेली नाही. पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे. मायकल लोबो यांच्यामध्ये चांगले नेतृत्व गुण आहेत. शिस्तीचे पालन केल्यास मंत्री, मुख्यमंत्रीपदी सुद्धा वर्णी लागू शकते, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
भाजप आघाडी सरकारकडे बहुमत कायम आहे. परंतु, सध्या मुख्यमंत्री आणि दोन आमदार आजारी असल्याने महिनाभरात विधानसभेत येऊ शकत नाहीत.
सभापती, उपसभापती यांची मंत्रिपदी वर्णी लावली असती तर विधानसभेत नवीन सभापती, उपसभापतींच्या निवडीच्या वेळी तीन आजारी आमदारामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पक्षाने योग्य विचार करून निर्णय घेतला आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.