भाजपसोबत युती नाहीच ः ढवळीकर

0
40

>> मांद्रेतील कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन; काही अटी मान्य झाल्यास कॉंग्रेससोबत युती

ज्या मगोचा हात धरून भाजपने विधानसभेत प्रवेश केला. त्याच भाजपने वेळोवेळी मगो पक्षाचा अपमान केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे मगोचे नेेेेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी यापुढे अपमान सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे.

मांद्रेतील मगोच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मगोचे मांद्रे मतदारसंघाचे उमेदवार जीत आरोलकर, पेडणे मतदारसंघाचे मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर, अनंत नाईक, माजी सरपंच सुभाष आसोलकर, पंच प्रवीण वायंगणकर, माजी सरपंच प्रदीप हडफडकर, पंच महादेव हरमलकर माजी सरपंच सेरेफिना फर्नांडिस, पंच गुणाजी ठाकूर, राघोबा गावडे आदी उपस्थित होते.
मगो पक्ष भाजपसोबत युती करणार अशा आशयाच्या बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून आणि सामाजिक माध्यमातून प्रसारित होत होत्या त्याविषयी मांद्रेचे मगोचे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना ढवळीकर म्हणाले की, आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकत मगो भाजप युती झाली होती. मात्र, भाजपने ज्याप्रकारे मगोचा अपमान केला, ते पाहता यापुढे कोणत्याही निवडणुकीत मगो भाजपशी युती करणार नसून कार्यकर्त्यांनी स्वबळावर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा.

आगामी निवडणुकीत भाजपसोबत मगो युती करणार नाही, परंतु कॉंग्रेस सोबत युती संदर्भात प्राथमिक बोलणी चालू आहे, काही अटी मान्य झाल्या तर कॉंग्रेससोबत युती होऊ शकते.
मांद्रे मगोचे नेते जीत आरोलकर यांनी बोलताना यंदा मांद्रेमधून केवळ मगो पक्षच परिवर्तन घडवून आणू शकतो आणि भाजपला केवळ मगोच टक्कर देऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही स्थिती मगो पक्ष भाजपसोबत युती करणार नाही. आणि इतर कोणत्याही पक्षाकडे युती झाली तर ही सीट मगो पक्षालाच उमेदवारी मिळेल आणि मगोचा आमदार विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला.