भाजपला जनाधार; विरोधक निराधार

0
9

>> जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत तिन्ही मतदारसंघांतून भाजपचे उमेदवार विजयी; कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाला अपयश

जिल्हा पंचायतींच्या तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत दवर्ली व रेईश मागूश मतदारसंघात भाजप उमेदवारांचा विजय झाला. कुठ्ठाळी मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने विजयश्री खेचून आणली. त्या उमेदवाला भाजपचा पाठिंबा होता. त्यामुळे तीनही मतदारसंघात एक प्रकारे भाजपने विजय मिळवल्याचे निकालातून स्पष्ट झाले. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या कुटनीतीनंतर कॉंग्रेस आमदारांचे झालेले घाऊक पक्षांतर यामुळे भाजपविरोधी वातावरण असेल आणि त्याची परिणिती मतांमध्ये होईल, अशी शक्यता होती; मात्र मतदारांनी भाजपवरच विश्‍वास दाखवल्याने त्यांच्या उमेदवारांची निवडणुकीत सरशी झाली.

भाजपने कुठ्ठाळीत आपला उमेदवार उभा केला नव्हता. कुठ्ठाळीचे आमदार आंतोनिओ वाझ यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. परिणामी या मतदारसंघातील उमेदवार आंतोनिओ वाझ यांच्या पत्नी मर्सियाना वाझ यांना भाजपने पाठिंबा दिला होता.

काल सकाळी ८ च्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. रेईश मागूश मतदारसंघातील मतमोजणी पेडे-म्हापसा, दवर्ली मतदारसंघातील मतमोजणी फातोर्डा-मडगाव आणि कुठ्ठाळी मतदारसंघातील मतमोजणी बायणा-वास्को येथे झाली.

दवर्ली मतदारसंघात ७ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार परेश नाईक यांनी आपचे उमेदवार सिद्धेश भगत यांचा ७०६ मतांनी पराभव केला. परेश नाईक यांना ४०८० मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सिद्धेश भगत यांना ३३७४ मते मिळाली. कॉंग्रेसचे उमेदवार लिओन्सिओ फर्नांडिस रायकर यांना १०८९ मते मिळाली. आप व कॉंग्रेसमध्ये मतविभागणी झाल्याने भाजप उमेदवाराची सरशी झाली.

कुठ्ठाळी मतदारसंघात ४ उमेदवार निवडणूक लढवत होते. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मर्सियाना वाझ यांनी २९४२ मतांनी विजय मिळवला. त्यांना ४४५३ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार लेस्ली आग्नेले गामा यांना १५११ मते मिळाली. कॉंग्रेसचे उमेदवार वॅलेंट बार्बोझा यांना १३६० मते मिळाली. आपचे उमेदवार जॉन डिसा यांना अवघ्या २९३ मतांवर समाधान मानावे लागले.

रेईश मागूश मतदारसंघात ४ उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संदीप बांदोडकर हे विजयी झाले. त्यांनी तब्बल ४२४४ मतांनी विजय संपादित केला. त्यांना ५३४५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार साईनाथ कोरगावकर यांना ११०१ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार राजेश दाभोलकर यांना १०९१ मते प्राप्ती. कॉंग्रेसच्या उमेदवार प्रगती पेडणेकर यांना केवळ ५०९ मते मिळाली. या चौरंगी लढतीत कॉंग्रेसचा उमेदवार चौथ्या स्थानावर फेकला गेला.

या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पक्षाचे तिन्ही उमेदवार पराभूत तर झालेच. शिवाय त्यांच्या मतांची टक्केवारी देखील खूपच कमी होती. रेईश मागूश मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या मतांची टक्केवारी केवळ ६.२७ टक्के एवढी आहे, तर भाजपच्या उमेदवाराच्या मतांची टक्केवारी ही ६५.८७ टक्के एवढी आहे.
दवर्ली मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या मतांची टक्केवारी अवघी १०.७९ टक्के, तर भाजपच्या उमेदवाराच्या मतांची टक्केवारी ४०.४२ टक्के एवढी आहे. आपच्या उमेदवाराला या मतदारसंघात ३३.४३ टक्के मते मिळाली. कुठ्ठाळी मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या मतांची टक्केवारी १७.७२ टक्के एवढी आहे, तर विजयी झालेल्या अपक्ष उमेदवाराच्या मतांची टक्केवारी ही ५८ टक्के एवढी आहे.

जनतेचा भाजपवरच विश्‍वास : मुख्यमंत्री

दवर्ली, कुठ्ठाळी व रेईश मागूश मतदारसंघातील जिल्हा पंचायतींच्या पोटनिवडणुकीत भाजपला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, गोमंतकीय जनतेने भाजपवरच विश्‍वास दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल निकालानंतर दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील भाजप सरकार राज्याचा विकास व जनतेची कामे करण्यावर भर देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या पोटनिवडणुकीत पक्षाच्या दवर्ली व रेईश मागूश मतदारसंघातील उमेदवाराचा भरघोस मतांनी विजय झाला, तर कुठ्ठाळी मतदारसंघात स्थानिक आमदार आंतोनिओ वाझ यांचे समर्थन लाभलेल्या अपक्ष उमेदवाराला पक्षाने पाठिंबा दिला होता. तेथे भाजपचा पाठिंबा लाभलेल्या मर्सियाना वाझ यांचा विजय झाला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतोनिओ वाझ यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने आम्ही त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.