भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यास  शिवसेना विरोधी बाकांवर : उद्धव

0
90

महाराष्ट्र विधानसभेचे खास अधिवेशन आजपासून
‘येत्या दोन दिवसांत काय ते सांगा’, असा वाटाघाटीसाठी पर्याय खुला ठेवतानाच, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केले की, भाजप जर महाराष्ट्रात सरकार टिकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना विरोधी बाकांवर बसेल. ‘भगवा दहशतवाद’ म्हणणार्‍या शरद पवारांच्या पक्षाचा पाठिंबा भाजप घेणार का, असा प्रश्‍नही त्यांनी केला.दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने यापूर्वीच भाजप सरकारला बिनशर्त बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेला भाजप-शिवसेना यांच्यातील तिढा कालही सुटू शकला नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकार विश्‍वासमत सिद्ध करणार असलेले विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.
आत्मसन्मानापुढे शिवसेनेला सत्तेची किंमत नाही, अन्यथा केंद्रीय मंत्रिमंडळात मिळेल ते पदरात पाडून घेतले असते. भाजपकडून येत्या दोन दिवसांत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलताना सांगितले. हिंदुत्त्ववादी शक्ती संघटित राहिल्या पाहिजेत. पण जर भाजप सरकार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना सरळ विरोधी बाकांवर बसेल, असे ठाकरे म्हणाले. मात्र भाजप-राष्ट्रवादी युती ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरेल, असे ते म्हणाले.
खासदार अनिल देसाई हे काल दिल्लीत गेले होते मात्र शपथविधी समारंभ टाळून परतले याबाबत विचारले असता, ठाकरे म्हणाले की, केंद्रात आम्हाला बरोबर घ्यायचे व राज्यात भूमिका स्पष्ट करायची नाही, हे शिवसेनेला मंजूर नाही. सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळा स्थान देण्यात आल्याचे निदर्शनास आणले असता ते म्हणाले की, सुरेश प्रभू यांना बाळासाहेबांनीच सर्वप्रथम मंत्री केले.

अनिल देसाईंनी केंद्रीय मंत्रिपद टाळले
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात शिवसेना नेते अनिल देसाई यांचा मंत्रिपदाची शपथ घेणार्‍यांच्या यादीत समावेश होता, मात्र ते उपलब्ध झाले नाहीत, असे राष्ट्रपती भवनकडून सांगण्यात आले.
राष्ट्रपती भवनात काल झालेल्या समारंभात २२ नवे मंत्री शपथ घेणार होते. त्यात अनिल देसाई यांचे नाव होते, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे २१ मंत्र्यांनी शपथ घेतली.
शिवसेना – भाजपमध्ये महाराष्ट्रात निर्माण झालेला तिढा कायम असल्याने उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांनी शपथविधी समारंभ टाळला असल्याचे कळते.