भाजपने बोलावली 18 रोजी एनडीएची बैठक

0
6

>> बैठकीत नवीन पक्ष सहभागी होण्याची शक्यता

>> भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही नवीन पक्षही सामील होण्याची शक्यता असून भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

या बैठकीसाठी भाजपने बिहारमधील जीतन राम मांझी यांची एचएएम, चिराग पासवान यांचा एलजेपी (राम विलास), मुकेश साहनी यांची व्हीआयपी आणि उपेंद्र कुशवाहांचा आरएलएसपी या पक्षांनाही बोलावण्यात आले आहे. पंजाबमधील अकाली दल (बादल) आणि आंध्र प्रदेशमधून माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षही (टीडीपी) यात येण्याची शक्यता आहे.

भाजपने महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील ज्या नेत्यांनी आणि पक्षांनी गेल्या काही वर्षांत रालोआ सोडली आहे, त्यांच्याकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांना एनडीएमध्ये स्थान दिले जाईल. उत्तर प्रदेशमधून ओमप्रकाश राजभर यांच्या सुहलदेव भारतीय समाज पक्षाला एनडीएमध्ये आणले आहे.

विरोधी पक्षांची दुसरी बैठक 17-18 रोजी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षासह 15 पक्ष सहभागी झाले होते. नितीश कुमार यांनी भाजपविरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न केला होता. या गटाची दुसरी बैठक 17 किंवा 18 जुलै रोजी बंगळुरूमध्ये होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एनडीच्या बैठकीत रामविलास पासवान यांचे उत्तराधिकारी म्हणून चिराग पासवान या बैठकीत सहभागी होणार आहेत. हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी यांच्यासोबत गेल्याने महादलितांची मते त्यांच्या बाजूने येतील, अशी भाजपला आशा आहे. विकासशील इन्सान पक्षाचे मुकेश साहनी यांच्या आगमनाने मच्छीमार आणि शेतकऱ्यांची मते भाजपला मिळू शकतात.

भाजपचे माजी मित्रपक्ष तेलगू देसम पक्ष आणि शिरोमणी अकाली दल यांच्याशीही भाजपने चर्चा सुरू केली आहे. एनडीएच्या विस्ताराने पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलले
भाजपने 6 दिवसांपूर्वी चार राज्यांचे अध्यक्ष बदलले आहेत. गेल्या 3 जुलै रोजी भाजपने पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बदलले. काँग्रेसमधून आलेल्या सुनील जाखड यांच्याकडे पंजाब, डी पुरंदेश्वरी यांना आंध्र प्रदेशात, जी किशन रेड्डी यांना तेलंगणात आणि बाबूलाल मरांडी यांना झारखंडमध्ये पक्षाची कमान देण्यात आली आहे. याशिवाय पक्षाच्या हायकमांडने एटाला राजेंद्र यांची तेलंगणातील भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांची राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य म्हणून नामांकन करण्यात आले. किरण यांनी या वर्षी एप्रिलमध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.