भाजपने फोडला निवडणूक प्रचाराचा नारळ

0
14

>> महालक्ष्मी देवीच्या दर्शनाने सुरुवात; भाजप लोकसभेच्या 370 जागांवर विजयी होईल; मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जागांवरील उमेदवार जाहीर झाल्यानंतर काल भाजपने आपल्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपो यांनी अन्य मंत्री, भाजपचे आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्रींचा आशीर्वाद घेतला. यावेळी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. गोव्यातील दोन्ही जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. भाजपने उमेदवार जाहीर करण्याबरोबरच प्रचारातही आघाडी घेतल्याने पक्षाला आता प्रचारासाठी जवळपास 40 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 370, तर भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला 400 च्या वर जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला. पणजीतील महालक्ष्मी मंदिरात पक्षाच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर ते बोलत होते. केंद्रातील भाजप सरकारने गेल्या 10 वर्षांत केलेला विकास डोळ्यांपुढे ठेवून आणि विकसित भारताचे लक्ष्य नजरेपुढे ठेवून गोव्यातील जनतेने भाजपला भरभरून मते द्यावीत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
गेल्या 10 वर्षांत देशात आरोग्य, पर्यटन, शिक्षण, साधनसुविधा व अन्य विविध क्षेत्रात भरघोस असा विकास झालेला आहे. या विकासात गोवा राज्य हे प्रथम क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेखाली राज्यात मोठा विकास झाल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. ‘डबल इंजिन’ सरकारने केलेला हा विकास असाच चालू रहावा व या विकासाला खीळ बसू नये यासाठी भाजपच्या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा निवडून आणा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
2004 ते 2014 ह्या काळात केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार होते. त्या 10 वर्षांत काँग्रेसने कोणता विकास केला. कोणत्या योजना सुरू केल्या ते जनतेला सांगावे, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेसला दिले.

मगोसोबतच्या युतीचा फायदा होणार : श्रीपाद नाईक
यावेळी श्रीपाद नाईक यांनी देखील केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. गेल्या 10 वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने देशभरात मोठा विकास घडवून आणलेला आहे. त्यामुळे देशाने प्रगती साधली असून भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपला विजयी करावे, असे आवाहन नाईक यांनी केले. यंदा मगो पक्षाची भाजपबरोबर युती असल्याने त्याचा फायदा पक्षाला मिळणार असल्याचेही नाईक म्हणाले.

दोन्ही जागांवर विजय निश्चित : सदानंद तानावडे
आजपासून भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. श्रीपाद नाईक व पल्लवी धेंपो यांना भरघोस मते मिळणार असून, दोन्ही जागांवर भाजपचा विजय निश्चित असल्याचे सदानंद शेट तानावडे म्हणाले.
यावेळी मंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर, सुदिन ढवळीकर, सुभाष फळदेसाई, गोविंद गावडे, रोहन खंवटे, नीळकंठ हळर्णकर, बाबूश मोन्सेरात, माविन गुदिन्हो, आलेक्स सिल्वेरा, आमदार दिगंबर कामत, डिलायला लोबो, नीलेश काब्राल, दयानंद सोपटे, जोशुआ डिसोझा, दाजी साळकर, बाबू कवळेकर, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी खासदार नरेंद्र सावईकर व विनय तेंडुलकर, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने हजर होते. दरम्यान, श्रीनिवास धेंपो हे मुंबईत असल्याने ते या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत.

60 हजारांच्या मताधिक्क्याने पल्लवी धेंपोंचा विजय निश्चित
यावेळी भाजपने दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपो यांना संधी दिली आहे. त्या 60 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पल्लवी धेंपो यांना उमेदवारी दिल्याने गोव्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलांना 50 टक्के एवढे प्रतिनिधीत्त्व मिळाले आहे. पल्लवी धेंपो ह्या राजकारणात नवख्या असल्या तरी सामाजिक कार्यात त्या आधीपासूनच आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उत्तर गोव्याच्या विकासात श्रीपाद नाईकांचे मोठे योगदान
उत्तर गोव्याचे खासदार म्हणून श्रीपाद नाईक हे गेल्या 25 वर्षांपासून निवडून येत आहेत. त्यांनी उत्तर गोव्यात भरपूर विकास केलेला असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच धारगळ येथे आयुष इस्पितळ उभे राहू शकले. त्याशिवाय भाऊंनी जलक्रीडा केंद्रही आणले. उत्तर गोव्यातील प्रत्येक क्षेत्रात पंचायतीत त्यांनी प्रकल्प आणला, अशा शद्बात मुख्यमंत्र्यांनी श्रीपादभाऊंची प्रशंसा केली.