भाजपनेच देशातील लोकशाही संपवली : काँग्रेस

0
7

काँग्रेस पक्षाने नव्हे, तर भाजपनेच देशातील लोकशाही संपवल्याचा आणि देशाची राज्यघटना धोक्यात आणल्याचा आरोप काल गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

गोवा प्रदेश भाजप मुख्यालयाच्या पायाभरणीवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाने देशातील लोकशाही संपवल्याचा व राज्यघटना धोक्यात आणल्याचा आरोप केला होता, त्या विधानाचाही पाटकर यांनी निषेध केला.

देवेंद्र फडणवीसांननी काँग्रेस पक्ष जाती-धर्माचे राजकारण करीत असून, लोकांमध्ये फूट घालत असल्याचा आरोपही केला होता. त्या आरोपावर बोलताना, जाती-धर्माचे राजकारण कोण करीत आहे व लोकांमध्ये फूट कोण घालत आहे हे सगळ्यांना माहीत असल्याचे पाटकर म्हणाले.

महाराष्ट्र, गोवा आदी राज्यांसह अन्य काही राज्यांतील बिगर भाजप पक्षांची सरकारे पाडून तेथे भाजपची सरकारे स्थापन करणाऱ्या भाजप नेत्यांना काँग्रेस पक्षावर लोकशाही संपवल्यासाठी काम करीत असल्याचा व जाती-धर्मांचे राजकारण करून फूट पाडत असल्याचा आरोप करण्याचा अधिकार नसल्याचे पाटकर म्हणाले.
महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडताना देवेंद्र फडणवीस यांना लोकशाहीचा विसर पडला होता का, असा प्रश्न करून त्यांनी महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप यावेळी पाटकर यांनी केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने गोव्यातील हिंदू व ख्रिस्ती धर्मींयामध्ये फूट घालण्याचा डाव आखला होता; मात्र त्यात त्यांना यश आले नसल्याचे पाटकर म्हणाले.