भाजपतर्फे दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपो

0
29

अपेक्षेप्रमाणे भाजपची दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी धेंपो उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालिका पल्लवी धेंपो यांना मिळाली. भाजपने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी काल नवी दिल्लीत जाहीर केली. या यादीतून पल्लवी धेंपो यांचे नाव जाहीर झाल्यानंतर प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी, पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी आणि आमदार डॉ. दिव्या राणे व डिलायला लोबो या दोन महिला आमदारांच्या उपस्थितीत पणजीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन पल्लवी धेंपो यांना भाजपची दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी मिळाल्याचे जाहीर केले.

पल्लवी धेंपो या लोकप्रिय अशा व्यक्ती असून धेंपो घराण्याने गोव्यासाठी केलेले समाजकार्य लक्षात घेऊन दक्षिण गोव्यातील मतदार त्यांना भरघोस मतांनी निवडून आणतील असे मुख्यमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पल्लवी धेंपो यांना निवडणुकीत तब्बल 60 हजार मतांची आघाडी मिळेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
गोव्यातील दोन मतदारसंघांपैकी दक्षिण गोवा या एका मतदारसंघात पल्लवी धेंपो यांना उमेदवारी देऊन भाजपने गोव्यात या निवडणुकीत महिलांना 50 टक्के एवढे प्रतिनिधित्व दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मोदी सरकारने दैशात महिला सबलीकरणाचे काम हाती घेतले असून निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात पक्षातर्फे प्रतिनिधित्व दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर बेटी बचाव-बेटी बचाव, सुकन्या, उज्ज्वला अशा कित्येक योजना महिला सबलीकरणासाठी सुरू केल्या. आता निवडणुकीतही महिलांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी देऊन त्यांना राजकीय क्षेत्रात पुढे येण्याची संधी प्राप्त करून दिल्याचे सांगितले. दक्षिण गोव्यातील महिलांनी मोठ्या संख्येने पल्लवी धेंपो यांना मते देऊन त्यांच्या विजयासाठी हातभार लावावा असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना केले.

पल्लवी धेंपो पूर्वीपासूनच
भाजप पक्षाच्या सदस्य

पल्लवी धेंपो या पूर्वीपासूनच भाजप पक्षाच्या सदस्य आहेत. त्यांना उमेदवारी देण्यापूर्वीच पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले आहे हा दावा खोटा असल्याचा खुलासा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. धेंपो घराण्याच्या स्नुषा असलेल्या पल्लवी धेंपो यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे. धेंपो चॅरिटेबल ट्रस्ट व धेंपो घराण्याने सुरू केलेल्या शैक्षणिक संस्था याद्वारे पल्लवली धेंपो यांनी केलेले कार्य हे अतुलनीय आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी यावेळी पल्लवी धेंपो यांचे कौतुक केले. त्यांना संपूर्ण गोवा ओळखत असून बांदोडा येथील ‘मातृछाया’ या संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान हे मोठे असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. पल्लवी धेंपो यांनी गोव्यात केलेल्या कार्याच्या बळावर दक्षिण गोव्यातील निवडणूक जिंकणे हे भाजपसाठी सोपे जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महिलेला दुसऱ्यांदा संधी
गोवा लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांना एका महिलेला उमेदवारी देण्यात आली असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात एका महिलेला उमेदवारी मिळाली होती असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात एका कर्तृत्ववान अशा महिलेला भाजपची उमेदवारी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो असे उद्गारही यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. पल्लवी धेंपो यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली असेल असे मुख्यमंत्री म्हणाले. पल्लवी धेंपो यांचे माहेर हे दक्षिण गोव्यात असून त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने दक्षिण गोव्यातील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

भाऊंमुळे गोव्यात आयुष इस्पितळ
उत्तर गोव्यासाठीचे पक्षाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, श्रीपादभाऊंनी उत्तर गोव्यात विकासाची गंगा आणली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गोव्यात ‘आयुष’ इस्पितळ उभे राहू शकले.

भाजप एकसंघ ः तानावडे
भाजप हा एकसंघ असून यावेळी राज्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपच जिंकेल, असा विश्वास यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला. गोव्याच्या विकासासाठी राज्यातील जनतेने यावेळी दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय व्हावा यासाठी अथकपणे काम करत आहेत. त्यामुळे 7 मे रोजी होणाऱ्या मतदानानंतर गोव्यातील भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास तानावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपचे आभार ः धेंपो
यावेळी बोलताना भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांनी, भाजपने आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आपण आभार मानत असल्याचे धेंपो यांनी सांगितले. विजयासाठी आपण सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी भारतासाठी जे स्वप्न पाहिले आहे ते सगळ्यांना माहीत असल्याचे सांगून त्यामुळे जनता भाजपलाच विजयी करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी सुलक्षणा सावंत, सुवर्णा तेंडुलकर, संजीव देसाई, आमदार कृष्णा साळकर, उल्हास तुयेकर, माजी आमदार दामू नाईक व भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सौ. पल्लवी एस. धेंपो यांचा परिचय

सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो या गोव्यातील उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी पार्वतीबाई चौगुले कॉलेज – मडगाव, गोवा येथून रसायनशास्त्रात पदवी आणि एमआयटी, पुणे येथून व्यवसाय व्यवस्थापनमध्ये (एमबीए) पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
सौ. पल्लवी धेंपो या धेंपो इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आहेत. त्या व्यवसायाच्या मीडिया आणि रिअल इस्टेट विभागावर देखरेख करतात. तसेच धेंपो चॅरिटीज ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. या संस्थेकडून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्‌‍या वंचितांना मदत केली जात आहे. या संस्थेकडून गोवा राज्यात प्री-युनिव्हर्सिटी लर्निंगच्या चार संस्था देखील चालविल्या जात आहेत. सौ. पल्लवी या धेंपो विश्व ग्रामशाळेच्या संरक्षकदेखील आहेत. कुटुंबाने मुलींंना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामीण शाळा दत्तक कार्यक्रमांतर्गत सरकारी उच्च माध्यमिक शाळा दत्तक घेतल्या आहेत. जे आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने मुख्य कौशल्यांपैकी एक मानले जाते.
जर्मनी आणि गोवा यांच्यातील सांस्कृतिक संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या इंडो-जर्मन एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेंडेल रॉड्रिक्स यांनी सुरू केलेल्या गोव्यातील फॅशन आणि टेक्सटाईल म्युझियम, मोडा गोवा फाउंडेशनच्या त्या विश्वस्त आहेत.

त्यांनी वर्ष 2012 ते 2016 पर्यंत गोवा विद्यापीठाशी संलग्न शैक्षणिक परिषदेच्या सदस्य म्हणूनही काम केले आहे. त्या गोवा कॅन्सर सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यदेखील आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या महिला परिषदेची समितीच्या कोअर समितीवर कार्यरत आहेत. त्यांची कौन्सिल आणि विविध संस्थांच्या दिशा आणि उपक्रम घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विविध उपक्रम आणि कार्यक्रमात सदैव सक्रिय सहभाग असतो. व्यवस्थापन आणि नेतृत्व पदांमध्ये लिंग विविधता समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी सक्रियपणे योगदान देत आहेत.