निवडणुकीच्या दुसर्याच दिवशी कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड या पक्षांची निवडणूक मूल्यांकन बैठक संपन्न झाल्यानंतर काल सत्ताधारी भाजपने आपली निवडणूक आढावा बैठक पणजीत घेतली. भाजपने यंदा प्रथमच चाळीसही मतदारसंघांत निवडणूक लढवलेली आहे. या चाळीसह मतदारसंघांतील निवडणुकीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
या मूल्यांकन बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड, सचिव नरेंद्र सावईकर व पक्षाचे बहुतांश उमेदवार हजर होते.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्क घसरल्याने पक्षात थोडेसे चिंतेचे वातावरण आहे; मात्र त्याचे कोणतेही प्रतिबिंब पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत दिसले नाही. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पक्षाला २२ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असून, सरकार स्थापन करेल, असेही ते म्हणाले.
या बैठकीत चाळीसही मतदारसंघांतील निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. तसेच मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी दिलेले योगदान व त्याचा पडलेला प्रभाव याबाबतही ऊहापोह करण्यात आला. तसेच या कार्यकर्त्यांचे आभारही यावेळी मानण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी सदानंद शेट तानावडे यांनी निवडणुकीचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले. कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड आघाडीने आपणाला २६ जागा मिळणार असल्याचा जो दावा केलेला आहे, त्यासंबंधी भाष्य करताना तानावडे यांनी दोन्ही पक्ष दिवास्वप्ने बघत असल्याचा टोला लगावला.
दरम्यान, १० मार्च रोजी मतमोजणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेसाठी जे जे काम करावे लागणार आहे, त्याचे नियोजन करण्यासाठी कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.