भाजपचे सांतइनेज नाला सफाईचे आश्‍वासन हवेत विरले

0
114

>> कॉंग्रेस पक्षाची टीका

>> पंचवीस वर्षे उलटूनही अपयश

भाजपने १९९४ ची गोवा विधानसभा निवडणूक लढविताना पणजी शहरातील महत्त्वपूर्ण अशा सांतइनेज खाडीची साफसफाई करण्यात येईल असे जाहिरातीच्या माध्यमातून आश्‍वासन दिले होते. परंतु, २५ वर्षे उलटली तरी भाजपला सांतइनेज खाडीची साफसफाई करता आलेली नाही. या खाडीच्या दुरवस्थेला भाजप जबाबदार आहे, अशी टिका कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड. यतीश नाईक यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

पणजी मतदारसंघातील भाजपच्या २५ वर्षांच्या राजवटीत नागरिकांना मूलभूत साधन सुविधा योग्य प्रमाणात मिळत नाहीत. भाजपचे उमेदवार जुनीच आश्‍वासने परत परत देऊन मतदारांची फसवणूक करीत आहेत. मतदार भाजपच्या पोकळ आश्‍वासनाला कंटाळले असून आगामी निवडणुकीत भाजपला योग्य धडा शिकवतील, असा विश्वास ऍड. यतीश नाईक यांनी व्यक्त केला.

१९९४ मध्ये दिले होते
नाला सफाईचे आश्‍वासन
भाजपने १९९४ साली एका इंग्रजी दैनिकाच्या पहिली पानावर जाहिरात प्रसिद्ध करून सांतईनेज खाडीची साफसफाई करण्याचे आश्‍वासन दिले होते, असे नाईक यांनी सांगितले. भाजपने त्यावेळी सांतइनेज खाडीच्या साफसफाईचा विषय निवडणुकीचा विषय केला होता. ऍड. नाईक यांनी पंचवीस वर्षांपूर्वीची वृत्तपत्राची प्रत पत्रकार परिषदेत सादर केली.
स्मार्ट सिटीचे काम पणजीत कुठेही दिसून येत नाही. पणजी शहरातील नागरिकांना भेडसावणार्‍या मूलभूत सुविधांना भाजप जबाबदार आहे, असा दावा नाईक यांनी केला.

मूलभूत सुविधा नाही
केंद्र सरकारने १३ ऑगस्ट २०१८ मध्ये देशातील १११ शहरांमधील लोकांच्या राहणीमानाचे केलेल्या सर्वेक्षणात पणजी शहराला ९० वे स्थान मिळाले आहे. पणजीतील नागरिकांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. रस्ते, वीज, कचरा, पार्किंग या सारख्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रोजगारांची समस्या सुध्दा भेडसावत आहे. तर, भाजपचे उमेदवार विकासाची मोठ मोठी आश्‍वासने देऊन फसविण्याचे काम करीत आहेत, असेही ऍड. नाईक यांनी सांगितले.