>> वाळपई आणि डिचोली मतदारसंघात उद्या सभा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज बुधवार दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दोन दिवसांच्या गोवा दौर्यावर येत आहेत. भाजपच्या वाळपई आणि डिचोली येथील प्रचार सभांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा सहभागी होणार आहेत. तसेच भाजपच्या वैद्यकीय विभागाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, सोमवारी या संदर्भात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी घेतलेल्या बैठकीत वाळपईत नड्डा यांच्या सभेला किमान पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. उद्या गुरूवारी वाळपई येथील कदंब बसस्थानकावर सकाळी १०.३० वा. जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या हस्ते भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.
दरम्यान, पर्ये येथेही घेण्यात आलेल्या बैठकीत वाळपईतील नडडा यांच्या सभेसाठी पर्ये मतदारसंघातून किमान दोन हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
विश्वजीत राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्तरी व पर्ये या दोन्ही मतदारसंघांत भाजपची यंत्रणा भक्कम झाली असल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला.
विश्वजीत राणे यांनी आपल्या वाळपईतील कार्यालयात घेतलेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष प्रथमच सत्तरी तालुक्यात येत आहेत. त्यामुळे सत्तरीवासीयांचा मोठा पाठिंबा भाजपला असल्याचे दर्शवण्यासाठी कार्यरत व्हा असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार उद्याच्या जाहीर सभेला सत्तरीतून पाच हजार तर पर्येतून दोन हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.
डिचोलीत कार्यकत्याशी संवाद
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्या गुरुवार दि. २५ रोजी दुपारी २ वा डिचोली मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. डिचोली मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन झांट्ये सभागृहात करण्यात आल्याची माहिती डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सभापती राजेश पाटणेकर, शिल्पा नाईक तसेच इतर नेते उपस्थित राहणार आहेत. डिचोली मतदारसंघात भाजपने कंबर कसली आहे.