भाजपचे निवडणूक प्रभारी गोव्यात दाखल; महिला उमेदवारांच्या नावांवर होणार खल

0
13

भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवारीच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी आशिष सूद यांचे गोव्यात काल आगमन झाले. येत्या दोन-तीन दिवसांत निवडणूक प्रभारी आशिष सूद यांच्या उपस्थितीत दक्षिण गोवा मतदारसंघासाठी संभाव्य महिला उमेदवारांची नावे निश्चित करून नवी दिल्ली येथे पाठविली जाणार आहेत.

भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघासाठी यापूर्वीच एकूण पाच नावे पाठविली होती. त्यातील दोघांना उमेदवारीतून माघार घेतली. माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी आमदार दामू नाईक अशी तीन नावे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीसमोर उमेदवारीसाठी विचारार्थ आली. यानंतर केंद्रीय पातळीवरून दक्षिण गोवा मतदारसंघासाठी संभाव्य महिला उमेदवारांची नावे पाठविण्याची सूचना करण्यात आली.

आशिष सूद यांच्या उपस्थितीत महिला उमेदवारांकडून येणाऱ्या अर्जांवर चर्चा करून निवडक महिलांच्या नावांची शिफारस केंद्रीय निवडणूक समितीकडे केली जाणार आहे.
भाजपच्या गाभा समितीच्या सोमवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत दक्षिण गोवा मतदारसंघासाठी महिलांच्या नावावर विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर निवडणुकीसाठी इच्छुक महिलांना आपली माहिती सादर करण्याची विनंती
करण्यात आली.