>> प्रदेशाध्यक्ष तानावडे यांची माहिती
मोदी सरकारने गेल्या एक वर्षाच्या काळात केलेल्या कामाविषयी भाजप कार्यकर्त्यांबरोबरच जनतेला माहिती देण्यासाठी भाजपने २० जून रोजी ‘व्हर्च्युअल रॅली’चे आयोजन केले आहे, अशी माहिती काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व सरचिटणीस दामू नाईक यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे या रॅलीद्वारे नवी दिल्लीहून राज्यातील सुमारे १ लाख लोकांना नरेंद्र मोदी यांनी वर्षभरात केलेल्या कामांची माहिती देणार आहेत. दुपारी ४ ते ६.३० या दरम्यान ही ‘व्हर्च्युअल रॅली’ होणार आहे. या रॅलीतून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व बाबू आजगांवकर, केंद्रीय मंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व प्रदेशाध्यक्ष श्री. तानावडे हेही भाजपच्या म्हापसा कार्यालयातून गोव्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
म्हापसा कार्यालयात समई प्रज्वलनाद्वारे मुख्यमंत्री रॅलीचा शुभारंभ करतील. नितीन गडकरी यांच्यानंतर स्थानिक नेत्यांची भाषणे होतील.
पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक यांची या रॅलीचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे. ही रॅली राज्यातील एक लाख लोकांपर्यत पोहोचावी यासाठी सर्व समाजमाध्यमांचा वापर करण्यात येणार असल्याचे तानावडे यांनी सांगितले.